नागपूर :- राज्यातील अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही.ग्रस्त मुलींना शिधापत्रिका व शिधावाटपाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील अनाथ दिव्यांग व एच.आय.व्ही. ग्रस्त मुलींना शिधापत्रिका व शिधावाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री भुजबळ बोलत होते. या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री भुजबळ म्हणाले की, राज्यस्तरीय अनाथ सल्लागार समितीचे सदस्य आमदार श्रीकांत भारतीय यांनी 26 एप्रिल 2023 रोजीच्या पत्रान्वये 11 अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही. ग्रस्त मुलींना शिधापत्रिका तसेच शिधा वाटप उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून पत्रात नमूद 11 मुलींचे निवासी पत्ते व संपर्क क्रमांक यांची माहितीच्या अनुषंगाने संबंधित मुलींचे निवासी पत्ते, संपर्क क्रमांक व शिधापत्रिका वितरित करण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त करून घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शिधापत्रिका वितरित करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अनाथ, दिव्यांग व एच.आय.व्ही.ग्रस्त व इतर समाजघटकांना नियमानुसार प्रचलित पद्धतीने शिधापत्रिका वितरित करण्यात येतात. यासाठी वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयाकडून मोहिमेचे आयोजन करून शिधापत्रिका वितरित करून त्यावरील अनुज्ञेय लाभ देण्यात येतात. तसेच अकरा मुलींच्या शिधापत्रिका देण्यास उशीर का झाला याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.