शिक्षक, कर्मचाऱ्यांबद्दल अविचाराने व्यक्त होताना.. थोडा विचार करा..!

नागपुर – राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी संपावर गेल्यानंतर कॉर्पोरेट घराण्यातील मीडिया व सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिळवणारे, IT मीडिया सेलच्या चेल्याचपाट्यांनी शिक्षक- कर्मचाऱ्यांबद्दल गरळ ओकणे सुरू केले आहे.

परंतु राज्यातील जे शिक्षक आणि अन्य सर्व संवर्गीय कर्मचारी जो संप करत आहे- तो संप कशासाठी आहे. त्या संपात सहभागी होणारे कोण आहेत याचा विचार विवेकाने करणे गरजेचे आहे.

शिक्षक-कर्मचाऱ्यांविषयी समाजामध्ये बदनामी करणारे ज्यावेळी जीवाच्या भीतीने स्वतःला घरामध्ये कोंडून घेऊन शेजाऱ्याचे तोंडही पाहत नव्हते- त्या कोरोना काळात / जागतिक महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांसाठी धावून जाणारे हेच कर्मचारी होते. याच आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलाबाळांचा विचार न करता, स्वतःच्या आजारपणाचा विचार न करता, सुट्ट्या न घेता- अहोरात्र दवाखान्यात आपले कर्तव्य बजावले. कोरोना प्रतिबंधात्मक पुरेशा उपाय योजनेची साधने नसताना आपल्या नाकातून शेंबडाची चाचणी करणारे हेच आरोग्य कर्मचारी होते. कोरोनाचा प्रसार-प्रचार होऊ नये यासाठी नदी-नाल्यावर, जिल्ह्याच्या सीमेवर अहोरात्र ड्युटी करणारे हेच शिक्षक होते. कोरोनाच्या त्या भयावह काळात संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ नये याकरिता अहोरात्र उन्हातानात उभे राहून, धूळ नाकात घेत आपले कर्तव्य बजावणारे हेच पोलीस होते. गावागावात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून घरोघरी भेट देणारे हेच ग्रामसेवक, पटवारी, नर्सेस, शिक्षक हे सर्व कर्मचारी आघाडीवर होते. शासकीय जिल्हा परिषद, पोलिस, नगरपालिकांचे वर्ग-१, २ चे अधिकारी (जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, गट विकास अधिकारी असे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी) अत्यंत आणीबाणीच्या स्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, पोलिसांना घेऊन कोरोनाच्या काळात सातत्याने लोकांच्या सेवेसाठी समोर आले होते.

महाराष्ट्रातून निघालेल्या गोरगरीब मजुरांच्या निवासाची त्यांच्या जेवणाची पदरमोड करून व्यवस्था करणारे हेच शिक्षक आणि कर्मचारी होते. रस्त्यावर उभे राहून गर्दी नियंत्रणात आणणारे उन्हातानात धुळीत माखणारे हेच पोलीस बांधव होते, नगर पालिका कर्मचारी होते.

कोरोनाने मृत्यू झालेल्या आपल्या सख्ख्या भावा-बहिणीला, माय-बापाला जेव्हा कुणी हात लावत नव्हतं, दुरूनही पाहत नव्हतं त्यावेळी त्या प्रेताला अग्नी देणारे हेच कर्मचारी होते, स्वच्छता कामगार होते. त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था पाहणारे हेच अधिकारी होते.

शेवटी वर्ग-१ पासून वर्ग-४ पर्यंत शासकीय सेवेत असणारे अधिकारी, कर्मचारी लब्ध प्रतिष्ठित अशा अति श्रीमंत घराण्यातील, कॉर्पोरेट घराण्यातून जन्माला आलेले नाही. ते सुद्धा शेतकरी-शेतमजूर, कष्टकरी, कामगार, साधारण वेतन घेणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातूनच पुढे आलेले आहेत.

शासनाच्या धोरणामुळे त्यांचे भविष्य काळोखात लोटले जाण्याची स्थिती असताना त्या आमच्या भावंडांसाठी जर आम्ही जुन्या पेन्शनची मागणी करत असू तर त्यात चुकीचे ते काय..? ज्या शासनाला आपण मायबाप म्हणतो ते शासन जर आमच्या न्यायसंगत मागणीचा अव्हेर करत असेल तर आम्ही काय करावे..?

आम्हा शिक्षक-कर्मचाऱ्यांचा शेतकरी शेतमजुराबद्दलचा दृष्टिकोनही अत्यंत सकारात्मक आणि मदतीचा राहिलेला आहे. दुष्काळाची, अतिवृष्टीची स्थिती निर्माण होत असताना शेतकरी-शेतमजुरांसाठी आपल्या वेतनातून हिस्सा देणारी आमची जमात आहे. अतिवृष्टीमुळे ज्यावेळी गोरगरीब सर्वसामान्यांचे हाल होते त्यांची व्यवस्था पाहणारी आमची जमात आहे.

शेवटी आम्ही कर्मचारी-शिक्षक हे आपल्याच कुटुंबातील एक आहोत.

दीड दमडीचे १० पैसे घेऊन बदनामीच्या पोस्ट करणाऱ्या IT आयटी सेल वाल्यांच्या कपोलकल्पित व भ्रामक अशा पोस्टने आपण कुणीही भूरळून न जाता, काही सन्मा. प्रसार माध्यमांचा अपवाद वगळता इतर प्रसार माध्यमांनी सुरू केलेल्या बदनामीचा आपण विचार करावा. कारण मोठमोठ्या उद्योगपतींना देशाची आर्थिक सर्व सूत्रे आपल्या हातात हवी आहेत. त्यांच्या कंपन्यांसाठी वेठबिगारी नोकर त्यांना पाहिजे आहे. यासाठी त्यांच्या कडील प्रचंड पैसा ओतून ते दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची बदनामी करतात. शिक्षक-कर्मचाऱ्यांची बदनामी करतात. दिंडोरी-नाशिक वरून मुंबईला निघालेल्या किसान मोर्चा ची बदनामी करतात.

जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात. हवालदिन होऊन जेव्हा आमचा शेतकरी आत्महत्या करतो. तेव्हा हीच मीडिया सेल शेतकऱ्यांना व्यसनी म्हणतात, जुगारी म्हणतात.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको अशी म्हणणारी कॉर्पोरेट घराणी जेव्हा शेतकऱ्याचा माल बाजारात येतो. तेव्हा भाव पाडण्यासाठी लॉबिंन करून प्रयत्न करतात, यशस्वी होतात.

शेतकरी-शेतमजुरांसह सर्वसामान्य कर्मचारी-शिक्षक अशा सर्वांचे खरे शत्रू हे मोठमोठे औद्योगिक घराणे आहेत. या मोठमोठ्या औद्योगिक घराण्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कराचा बॅंकेतून कर्जरूपाने घेतलेला पैसा परत केला नाही; तर ते देशाबाहेर पळून गेले. यांच्यामुळे बँका डबघाईस आल्या. यांच्यामुळे अर्थव्यवस्था बुडत असताना आपण आपले खरे नुकसान करणारे न ओळखता, केवळ अफवांवर विश्वास ठेवन आपल्या कर्मचारी-शिक्षकांना दोष देणे योग्य ठरणार नाही.

भूमिका गौतम मेश्राम

@ फाईल फोटो 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला सर्पमित्र चैताली भस्मे ने दिया जीवनदान

Fri Mar 17 , 2023
नागपुर :- जयदुर्गा हाउसिंग सोसाइटी सोमलवाड़ा मनीष नगर नागपुर में घर के रास्तेपर एक गाय दो घंटे से बैठी थी बछड़े के सिर्फ दो पाव थोड़े बाहर निकलेहुए दिखाई दीये तृप्ति तांबे नामक सुजान महिला ने तुरंत चैताली भस्मे को फोन करके गाय की हालत बताई …तुरंत चैताली ने वहा पोहिचकर संस्था के सदस्य पंकज आंबटकर जो की किसान के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!