वर्धा येथे ४-५ फेब्रुवारी रोजी आयोजन
‘माझा शेतकरी : भग्न स्वप्नांचे वास्तव.
वर्धा :- येथे शनिवार ४ आणि रविवार, ५ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘१७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलना’त नानू नेवरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘माझा शेतकरी भग्न स्वप्नांचे वास्तव. या संकल्पनेंतर्गत शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या जगण्यातील विदारक वास्तव नानू नेवरे यांनी चार बाय सहा फूट आकारातील ‘ब्लॅक अँड व्हाइट’ संगतीमधून चित्रबद्ध केले आहेत.
आपल्या सृजनात्मक आणि रचनात्मक छायाचित्रांच्या माध्यमातून नानू नेवरे यांनी वास्तववादातून अतिवास्तववादाकडे जाणारी आपली कलात्मक यात्रा प्रभावीपणे केली आहे. आपल्या या अर्थपूर्ण कलात्मक यात्रेत त्यांनी वास्तव दृश्यांना अतिवास्तववादाचे रूप देऊन अद्भुत बनवले आहे. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनाची ओळख होते.
रहस्यमय आणि अनाकलनीय जगात या कृषिप्रधान देशातील शेतकरी स्वतःला एकटा समजत आहे, याचा संवेदनात्मक अनुभव त्यांच्या छायाचित्रांतून मिळतो. शेतकऱ्याला आता ‘स्व’चा विसर पडला आहे. तो आता हवालदिल झाला आहे. आपला अंत निश्चित आहे, असे त्याला वाटते. अशा भावनांतर्गतच्या आंतरिक ताणतणावाचे कलात्मक, नाट्यमय, दृश्यात्मक प्रस्तुतीकरण नानू नेवरेंनी या छायाचित्रांच्या माध्यमातून वास्तव स्वरूपात केले आहे.
स्वतःचा कोणताही तर्क न लावता शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांची अगतिकता समर्थपणे त्यांनी आपल्या छायाचित्रातून मांडली आहे. आपल्या कलात्मक अविष्कारातून शेतकऱ्यांच्या भग्न स्वप्नांचे वास्तव त्यांनी या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रकट केले आहे. रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन, वैदर्भीय कला अकादमीतर्फे करण्यात आले आहे.