संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील हनुमान मंदिर जवळील फटाका सेंटर जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपात एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 5 दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव अविनाश प्रकाश लांडगे वय 35 वर्षे रा बाबा महल्ले ले आऊट येरखेडा असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर मृतक तरुण हा विवाहित असून कुटुंबात पत्नी तसेच पाच वर्षांचा मुलगा असून नागपूर च्या एका मॉल मध्ये खाजगी नोकरदार असून माजी सैनिकाचा पुत्र होता.दैनंदिन प्रमाणे आज सकाळी 10 वाजता नागपूर ला कामावर जाण्याची तयारी करून दुचाकीने जात असता अज्ञात कारणाहून कामठी नागपूर महामार्गावरील हनुमान मंदिर जवळ दुचाकी उभी करून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे, पोलीस कर्मचारी संजय पिल्ले यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर पुढील उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले.
घटनास्थळी एक दुचाकी, बॅग व मृतकाच्या खिश्यात विषारी औषध ची शिशी आढळली . पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदसत्यात आहे. मात्र आत्महत्येचे कारण कळू शकले नसले तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर असा आत्महत्ये सारखा अनर्थ घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.