विकसित भारत संकल्प यात्रा अभियान जनआंदोलनाद्वारे यशस्वी करावे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

– समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून भारत विकसित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट

मुंबई :- विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित भारत संकल्प यात्रा अभियान’ यशस्वी करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

आज विकसित भारत सकंल्प यात्रेअंतर्गत सहभागी झारखंड, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यातील लाभार्थ्यांसोबत प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे संवाद साधला.

१५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत या यात्रेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली असून, त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा देखील समावेश आहे. या उपक्रम अंतर्गत बृहन्मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष अशा चार वाहनांद्वारे २८ नोव्हेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मुंबईतील ‘डी’ वॉर्ड कार्यालयात मुंबई शहरचे पालक मंत्री तथा मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रिय कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कळ दाबून ‘ड्रोन दीदी’ आणि ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना’ यांचे उद्घाटन केले. यावेळी या दोन्ही योजनांवर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. जन औषधी केंद्र 25 हजार करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना शुभेच्छा दिल्या आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती इतर गावांमधे पोहोचविण्याचे आवाहन केले. कृषी क्षेत्रात ड्रोनचे महत्व असून, याद्वारे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिलांचा या योजनांमधला सहभाग प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. १५ हजार ड्रोन वितरित करण्यात आले आहेत. महिला बचत गटांच्या सहायाने महिलांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माय भारत अभियानातही सहभाग नोंदविण्याचे त्यांनी यावेळी आहवान केले.

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी म्हणाले की, जनजाती दिवसानिमित्त सुरू झालेली संकल्प यात्रा देशातील 12 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमधे पोहचली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामधे सहभाग नोंदविला असून, या यात्रा अभियानाला जनआंदोलनाच्या रूप देऊन भारताच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी म्हणाले की, सेवाभावाने कार्य करून देशातील सर्व गावांमधे या यात्रेद्वारे शासकीय योजना पोहचविण्याचे काम केंद्र शासन करीत आहे. शेतीला आधुनिक बनविणे, जनतेला कमीत कमी दरात औषधांचा पुरवठा करणे, युवकांना रोजगार देणे तसेच गरीबांना मोफत राशन देण्याचे कार्य केंद्र शासन करीत असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितले.

यात्रेचे उद्द‍िष्ट

मुंबईतील 227 ठिकाणांवर ही चार वाहने फिरणार असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड आदी विविध योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणे. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात. ही यात्रा राज्यातील एकूण 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थातील 2084 परिसरातून फिरणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला विविध कार्यांचा आढावा

Thu Nov 30 , 2023
– हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन सज्ज नागपूर :- नागपुरात येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या अख्यत्यारीत असलेल्या विविध कार्याचा नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवार (ता.३०) रोजी आढावा घेतला. नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात घेण्यात आलेल्या बैठकीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com