-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत व्याख्यानमाला
नागपूर :- विश्वरूप म्हणजे संपूर्ण जगाला एकच शिकवण देणे नव्हे. या जगात अनेक व्यक्तींची अनंत मने आहेत. त्या प्रत्येक मनाला शिकवण देईल तोच विश्वगुरू आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण संघ बेलूर मठ येथील वरिष्ठ संन्यासी पूज्यपाद स्वामी पितांबरानंद यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी पर्व निमित्त राष्ट्रसंत व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सोमवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी व्याख्यान मालेतील पाचवे पुष्प गुंफतांना पूज्यपाद स्वामी पितांबरानंद बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर अतिथी वक्ता म्हणून रामकृष्ण संघ बेलूर मठ येथील वरिष्ठ संन्यासी पूज्यपाद स्वामी पितांबरानंद, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राष्ट्रसंत अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांची उपस्थिती होती. ‘जगावे कसे हे स्वामी विवेकानंदांनी शिकवावे’ या विषयावर पुढे मार्गदर्शन करताना स्वामी पितांबरानंद यांनी स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट व्याख्यानात उलगडला. अमेरिकेतील शिकागो शहरात ११ सप्टेंबर १८९३ मध्ये झालेल्या धर्म संसदेत स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाने संपूर्ण जगाला प्रभावित केले. स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या सात मिनिटाच्या भाषणामध्ये मनुष्य हाच ईश्वर तसेच प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे असे सांगितल्याचे स्वामी पितांबरानंद म्हणाले. आज धर्माचा वेगळा अर्थ काढला जातो. अध्यात्मच हा माणसाचा धर्म आहे. मात्र, या मानवी धर्मात कर्मकांडाला महत्व नसल्याचे स्वामी म्हणाले. ज्ञानमार्ग चांगला असला तरी तो शुष्क असतो, भक्ती मार्गाला उदात्त महत्व असले तरी नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे यात एकमेकांशी न भांडता एकत्र राहिले पाहिजे. श्री रामकृष्ण यांचे जीवन या समन्वयाचे मूर्तीमंत आदर्श आहे. त्यांच्या आयुष्यातील एक-एक पैलूंचा उलगडा केल्यास आदर्श जीवन तयार होते. यावेळी स्वामी पितांबरानंद यांनी संन्यासी व गृहस्थ जीवन, शंकराचार्य, वेद, असांप्रदायिक समुदाय, गुरु- शिष्य परंपरा, विश्व धर्माचा व्यापक विचार याबाबत विस्तृत माहिती दिली.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाबाबत माहिती दिली. त्यांचे कर्मयोग, अध्यात्म योग, धर्मयोग हे संपूर्ण मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असल्याने स्वामी विवेकानंद हेच विश्वगुरू असल्याचे म्हटले. स्वामी विवेकानंद यांच्या रूपाने सामाजिक विचार पेरणारा तारारा निर्माण झाल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रसंत अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी व्याख्यान माला आयोजित करण्याबाबतची माहिती दिली. सोबत व्याख्याते म्हणून उपस्थित राहिल्याने स्वामी पितांबरानंद यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.