इस्टोनिया महाराष्ट्राशी सायबर सुरक्षा, ई-गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक : मार्जे लूप

– महाराष्ट्रातील सांस्कृतिक पथक इस्टोनियाला बोलावणार

मुंबई :- पूर्वीच्या सोव्हिएत युनिअन मधून स्वतंत्र झालेला इस्टोनिया हा देश सायबर सुरक्षा, ई – गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो व्यवस्थापन आदी उच्च तंत्रज्ञान जगात अग्रस्थानी असून या क्षेत्रात भारताशी आणि विशेषतः महाराष्ट्राशी सहकार्य करण्याबाबत उत्सुक असल्याची माहिती इस्टोनियाच्या भारतातील नवनियुक्त राजदूत मार्जे लूप यांनी आज येथे दिली.

पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या मुंबई भेटीवर आलेल्या इस्टोनियाच्या राजदूत मार्जे लूप यांनी बुधवारी (दि. १२ जून) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

इस्टोनिया देशाने डेटा सुरक्षेच्या दृष्टीने लक्झेम्बर्ग येथे स्वतःचा ‘माहिती दूतावास’ – डेटा एम्बासी – सुरु केली असून क्लाउड तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा सुरक्षित ठेवल्या जातो असे सांगून डेटा सुरक्षा क्षेत्रात इस्टोनिया भारताला व महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करू शकेल, असे राजदूतांनी सांगितले. भारतातील जिओ व टीसीएस कंपन्यांशी देखील सहकार्य करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्टोनिया देशाचे स्वतःचे प्रतिष्ठित आणि जुने ‘टॅलीन तंत्रज्ञान विद्यापीठ’ असून या विद्यापीठात इ- गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, उपयोजित अभियांत्रिकी, जहाज बांधणी व इतर उच्च कौशल्ये शिकविली जातात असे सांगून या विद्यापीठाशी महाराष्ट्र राज्याने सहकार्य प्रस्थापित केल्यास ते उपयुक्त ठरेल असे राजदूतांनी सांगितले.

इस्टोनिया देशाची लोकसंख्या १४ लाख असून तेथे नागरिकत्व दिले जात नसले तरीही इ-रेसिडेंसी दिली जाते असे सांगून मुकेश अंबानी आपल्या देशाचे इ – निवासी असल्याचे त्यांनी सांगितले. इस्टोनियाचे इ – रहिवासी होऊन तेथे उद्योग / कंपनी सुरु करता येते असे त्यांनी सांगितले.

इस्टोनिया देशाचा ५० टक्के भूभाग जंगलाने व्याप्त असून मोठा भाग निर्मनुष्य परंतु जैवविविधतेने नटलेला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशातील मध्ययुगीन शहरे व बंगले पर्यटकांना आवडतील असे सांगून भारतीय पर्यटकांनी इस्टोनियाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

सांस्कृतिक सहकार्य परस्परांना जोडण्यास मदत करते असे सांगून इस्टोनिया आपले कॉयर समूह भारतात पाठवेल तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक पथक इस्टोनियाला बोलावणार असल्याचे राजदूतांनी सांगितले.

काही देशांची अर्थव्यवस्था जगातील युद्धजन्य स्थितीमुळे मंदावत असली तरीही भारताची अर्थव्यवस्था उत्तम गतीने वाढत आहे असे सांगून भारताशी व्यापार, वाणिज्य व सांस्कृतिक संबंध वाढविण्याची सध्याची वेळ योग्य असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजदूतांना सांगितले.

इस्टोनियाच्या टारटू विद्यापीठात १८३७ पासून संस्कृत भाषा शिकवीत असत. परंतु कालांतराने संस्कृत भाषा वर्ग बंद झाले. या विद्यापीठाला संस्कृत अध्यापक उपलब्ध करून संस्कृत भाषा वर्ग पुन्हा सुरु करण्यास महाराष्ट्रातील संस्कृत विद्यापीठ मदत करेल असे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले. इस्टोनियाने विद्यार्थी व अध्यापक आदानप्रदान वाढवावे तसेच सांस्कृतिक संबंधांना गती द्यावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला इस्टोनियाचे भारतातील दूतावासाचे उपप्रमुख मार्गस सोलसन व मुंबईतील मानद वाणिज्यदूत सुनील खन्ना हे देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आपसी समन्वयातून शासकीय योजनेचे लाभ नागरिकांपर्यत पोहोचावा – जिल्हाधिकारी

Wed Jun 12 , 2024
 आरोग्य यंत्रणेचा समग्र आढावा  प्रत्येकाचे आधार कार्ड व बँक खाते काढण्‍यासाठी विशेष मोहिम गडचिरोली :- प्रत्येक व्यक्तीचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून शासनामार्फत नागरिकांकरिता विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती त्यांचेपर्यंत पोहोचवून योजनेचा लाभ दुर्गम व अतिदुर्गम भागातील गरजूंना मिळावा यासाठी सर्व विभागाच्या तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय यंत्रणेने आपसात समन्वय राखून एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com