– धम्मचक्र प्रवर्तन दिन व्यवस्थेचा आढावा
नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध अनुयायांच्या कुठल्याही प्रकारे गैरसोय होउ नये यादृष्टीने आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन यासह सर्व सुविधा सुसज्ज करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिका द्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा मंगळवारी (ता.१०) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता अजय मानकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखोंच्या संख्येत बौद्ध अनुयायी नागपूर शहरातील दीक्षाभूमीला भेट देतात. या सर्व नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्व मुलभूत सुविधांची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी बैठकीमध्ये दिले. नागरिकांची गैरसोय होउ नये तसेच त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणे, संपूर्ण परिसरात स्वच्छता राखणे, सर्वत्र विद्युत पुरवठा करणे, पिण्याचे पाणी, शौचालय, परिवहन सेवा या सर्व सुविधा सुरळीतपणे चालविल्या जातील, यादृष्टीने नियोजन करण्याचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केले. दीक्षाभूमीवर येणा-या मार्गांवर मुख्य चार ठिकाणी अनुयायांच्या सेवेसाठी मनपाच्या आरोग्य चार तपासणी केंद्रांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय संपूर्ण मार्गावर पिण्याच्या पाण्याचे १४० नळांची व्यवस्था असेल. याशिवाय तात्पुरत्या स्वरुपात ९०० शौचालयांची देखील व्यवस्था नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय ४ फिरते प्रसाधनगृहांची देखील सोय असेल. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी ६६४ स्वच्छता कर्मचारी अहोरात्र स्वच्छतेची सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. बौद्ध अनुयायांच्या निवासासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) परिसरामध्ये नागरिकांच्या निवासासाठी १५ हजार वर्ग फुट आकाराचे निवास केंद्र तर अंध विद्यालयाच्या परिसरामध्ये ६ हजार वर्ग फुट आकाराचे निवास केंद्र उभारण्यात येणार आहे. आपात्कालीन परिस्थितीत दीक्षाभूमीच्या जवळच्या भागातील १० शाळांमध्ये देखील निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमे-यांची निगराणी असेल. आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनपाचे अग्निशमन व आपात्कालीन सेवा पथक तैनात करण्यात आलेले आहेत. परिवहन विभागाद्वारे बस स्थानक, रेल्वे स्टेशन येथून दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस कामठी आणि इतर महत्वाच्या स्थळी जाण्यासाठी विशेष ७० बसेसची देखील व्यवस्था केली आहे.
विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या सर्व व्यवस्थेची माहिती देण्यासाठी तसेच नागरिकांना आवश्यक मदतीसाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक शेजारी मनपाचे नियंत्रण कक्ष २४ तास मदतीसाठी तत्पर असणार आहे. या संपूर्ण व्यवस्थेचे योग्य नियोजन करून नागपूर शहरात येणा-या अनुयायांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने प्राधान्याने कार्य करण्याचे निर्देश देखील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.