दरवाढ विरहीत पर्यावरणपूरक परिवहन व्यवस्था,परिवहन विभागाचा अर्थसंकल्प प्रशासकांना सुपूर्द

नागपूर : तिकीट दरात कुठलिही दरवाढ नाही, डिझेल बसेस कमी करून पर्यावरणपूरक ईलेक्ट्रिक बसेसचा अंतर्भाव असलेला परिवहन विभागाचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२२-२३ चा सुधारित व २०२३-२४ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मनपा प्रशासक आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपविला. यानंतर त्यांनी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सांगितले की, २०२३-२४ च्या वार्षिक अर्थसंकल्प ‘ब’ चे उत्पन्न ३५८.८७ कोटी अपेक्षित आहे. सुरूवातीची २१.४५ लक्ष शिल्लकेसह एकूण उत्पन्न ३५९.०८ कोटी अपेक्षित उत्पन्न गृहित धरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३५८.८८ कोटी रुपये खर्च होईल. मार्च २०२४ अखेर अपेक्षित शिल्लक २०.३८ लक्ष एवढी राहिल.

परिवहन उपक्रमाच्या परिचलनाकरिता शहर परिवहन निधी तसेच महसुलाच्या जादा शिल्लकीचा विनियोग करण्याकरिता ‘महसूल राखीव निधी’ या नावाने स्वतंत्र निधी खाते उघडण्यात आले आहे. याशिवाय परिवहन सुधारणा निधी सुद्धा स्थापन करण्यात आलेला असल्याचे परिवहन व्यवस्थाप भेलावे यांनी सांगितले. मनपाच्या परिवहन सेवेमध्ये सध्या ६१ ईलेक्ट्रिक बसेस, ४५ मिनी बसेस, १५० मिडी व डिझेल आणि सीएनजी वरील २३७ अशा एकूण ४९३ बसेसचा समावेश आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्वाचा पुढाकार घेउन केंद्र शासनाकडून १५व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीचा उपयोग शहरात ई-बसेससाठी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने वातानुकूलित १४४ ई-बसेस पीएमआय या विद्युत बसेस निर्माण करणा-या कंपनीशी करार करण्यात आला आहे. २०२३ वर्षाच्या अखेरपर्यंत मनपाच्या परिवहन सेवेमध्ये या बसेस सामील होतील, असा विश्वास परिवहन व्यवस्थापक  रवींद्र भेलावे यांनी व्यक्त केला.

‘फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्यूफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड व्हेईकल’ अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी १०० टक्के ई-बसेसला प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे १०० इलेक्ट्रिक बसेसच्या संदर्भात केंद्र शासनाद्वारे मंजूरी प्राप्त झाली. मनपाद्वारे तुर्तास ४० ई-बसेस खरेदीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मे.इव्ही ट्रान्स प्रा.लि. या कंपनीशी करार करून नोव्हेंबर २०२२ मध्ये ४० बसेस प्राप्त झाल्या. बसेसच्या चार्जिंग करिता वाडी डेपो येथे अंदाजे तीन एकर जागेत अद्ययावत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जानेवारी २०२३ पासून या सर्व बसेस शहर परिवहन सेवेत कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लि. द्वारे मनपाच्या परिवहन विभागाला ४० वातानुकूलित ई-बसेस देण्यात येणार असून त्यापैकी १५ बसेस जानेवारी २०२३ मध्ये मनपाला प्राप्त झालेल्या आहेत. यासाठी नियुक्त मे. टाटा मोटर्स लि. कंपनीशी करार झालेला असून कंपनीकडून १५ डी.सी. चार्जर्स इलेक्ट्रिक चार्जिंग यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली असल्याचेही रवींद्र भेलावे यांनी यावेळी सांगितले.

परिवहन विभागाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कुठलेही भाडेवाढ नाही. याशिवाय सामाजिक दायित्वातून सुरू असलेले उपक्रम सुद्धा सुरू ठेवण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापकांनी सांगितले. माजी सैनिक, दिव्यांग यांना नि:शुल्क प्रवास, विद्यार्थ्यांना ६६ टक्के आणि ज्येष्ठांना ५० टक्के सवलतीची योजना यावर्षीही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.

मोरभवन बसस्थानकाच्या विकासाचा मार्ग मोकळा

नागपूर शहरातील मोरभवन बसस्थानकाच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे यावेळी परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी नमूद केले. मोरभवन बसस्थानकाचे विकासकार्य येथील वृक्षांमुळे रखडलेले होते. मोरभवन बसस्थानकाच्या विकासाकरिता २०१७ मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून मनपाला ५ एकर जागा प्राप्त झाली. मात्र येथील वृक्षांच्या प्रश्नामुळे हे कार्य प्रलंबित होते. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वृक्ष प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. परिवहन विभागाद्वारे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिष्ठांना पत्र देउन त्यांच्या तज्ज्ञांद्वारे सदर जागेवरील पुनर्लागवड करता येण्यायोग्य झाडांचा अहवाल मागवून ही झाडे गोरेवाडा येथे पुनर्लागवड करण्यात येतील. याशिवाय जी झाडे पुनर्लागवड करता येणार नाही ती झाडे तोडून त्या झाडांच्या वयोमानाएवढी वृक्षलागवड परिवहन विभागाद्वारे करण्यात येईल, असेही रवींद्र भेलावे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महसूल क्रीडा स्पर्धांसाठी मानकापूर क्रीडा संकुल सज्ज, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली पाहणी

Sat Feb 25 , 2023
नागपूर :- नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन उद्यापासून नागपूर येथे होत असून या स्पर्धांसाठी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल विविध सुविधांनी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज क्रीडा स्पर्धा आयोजनाची तयारी व व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, उपजिल्हाधिकारी शेखर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते.    […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!