चंद्रपूर : – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.१७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन बऱ्याच बचत गटांना दिवाळी निमित्त पदार्थांचे ऑर्डर सुद्धा मिळाले आहेत.
मनपाद्वारे आयोजीत या महोत्त्सवात ३० महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला होता तसेच सर्व बचतगटांसाठी निःशुल्क सहभाग होता. बचतगटाद्वारे हातांनी बनविलेले पदार्थ जसे चकली, शेव,अनरसे,बालुशाही, चिवडा या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आली. घरी नेण्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या वस्तुंचे ऑर्डर सुद्धा दिले. महिलांनी तयार केले विविध प्रकारचे लोणचे, शोभेच्या वस्तु, कापडी पिशवी, दिवे, रांगोळी, मातीचे भांडे या सर्वांची लाखोंच्या घरात विक्री होऊन दिवाळीनिमित्त बचतगटांच्या आर्थीक बचतीस हातभार लागल्याचे समाधान तसेच असे विक्री व प्रदर्शन दर वर्षी लावण्याचा मानस आयुक्त विपीन पालीवाल यांनी व्यक्त केला. सदर प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजना प्रमुख रफिक शेख, रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, शहर अभियान व्यवस्थापक तसेच समुदाय संघटक पांडुरंग खडसे, सुषमा करमनकर, रेखा लोणारे, रेखा पाटील, चिंगुताई मुन यांनी अथक परीश्रम घेतले.