नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत बुधवार (ता२९) रोजी लक्ष्मीनगर झोन येथील मनपा शाळा कामगार कॉलनी आणि बुद्ध विहार जवळ गोपालनगर येथे आयोजित विशेष शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
लक्ष्मीनगर झोन येथील शिबिराचे उद्घाटन उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह झोनल कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरणार असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे.
“विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध योजनांत पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जात आहे. वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार आहे.