– प्रभात फेरी काढत, गुलाब पुष्पवर्षाव करीत शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
– “मिशन नवचेतना” मुळे शाळेचे वातावरण प्रफुल्लीत
नागपूर :- उन्हाळ्याच्या सुट्यानंतर सोमवार १ जुलैपासून मनपाच्या सर्व शाळा पुन्हा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी मनपाच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सुट्यांनंतर सकाळी शाळांची घंटा वाजताच गुलाब पुष्प वर्षाव करीत विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले. मनपाच्या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू यायला लागला असून, “प्रवेशोत्सवा”मुळे विद्यार्थी भारावल्याचे दिसून आले.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांसाठी अविस्मरणीय ठरवा म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘प्रवेशोत्सव’ अंतर्गत जय्यत तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची हुरहूर लागावी, आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या ९६ प्राथमिक व २८ माध्यमिक अशा एकूण १२४ शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. प्रभातफेरी काढत शिक्षकांनी गुलाब पुष्प वर्षाव करीत उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
‘प्रवेशोत्सवाचा’ मुख्य कार्यक्रम कपिल नगर चौक येथील कपिल नगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, शाळा निरीक्षक कीर्ती गणवीर, शाळा निरीक्षण टेंभूर्ने, कपिलनगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधू मेश्राम, माध्यमिकचे मुख्याध्यापक गुलाब मेश्राम शाळा सुधार समितीच्या अध्यक्षा सीता शाहू, यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे मनपाचा भर राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी साधना सयाम पुढे म्हणाल्या की, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात मनपाच्या शाळांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम “मिशन नवचेतना” राबविण्यात येत असून, अभियांतर्गत विविध शाळांचे कायापालट करण्यात आला असून, नाविन्यपूर्ण कल्पकतेने शाळेचे वातावरण प्रफुल्लीत झाले असल्याचे सयाम यांनी सांगितले. तसेच प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थांमध्ये शाळा आणि शिक्षण याप्रती गोडी निर्माण व्हावी हा प्रयत्न केला जात असल्याचेही सयाम यांनी सांगितले.
‘प्रवेशोत्सवासाठी शाळेच्या आवारात विद्यार्थांच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी, प्रवेशद्वाराला फुगे लावून सजावट केली होती. तत्पूर्वी अनेक शाळांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. शाळांमध्ये मुलांना चॉकलेट, बिस्कीट व खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसले. शाळा सुरू झाल्याने फुले, चित्रे, फुग्यांनी सजवलेली शाळा, पाठीवर दप्तर घेऊन आई-बाबांचा हात घट्ट धरून रडणारी, तर काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी मुले दिसून आली.
पाहिल्या दिवशी नियमित प्रार्थनेने शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे पुष्प भेट देण्यात आले. तसेच वर्गात प्रवेश करतांना विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्य देण्यात आले. तसेच पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.