अभियंत्यांनी बांधकामात नवीन तंत्राचा
वापर स्वीकारावा : ना. नितीन गडकरी
– सिव्हिल अभियंत्यांची 36 वी राष्ट्रीय परिषद
नागपूर-
रस्ते असो की इमारत बांधकामात अभियंत्यांनी नवीन तंत्राचा वापर स्वीकारून बांधकामाचा खर्चात बचत करावी. हे करताना प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. तसेच बांधकाम क्षेत्रासाठी लागणार्या वाहनांमध्ये जैविक इंधनाचा वापर करावा. यामुळे पर्यावरण दूषित होणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सिव्हिल अभियंत्यांच्या 36 व्या राष्ट्रीय परिषदेला ना. गडकरी आभासी कार्यक्रमातून संबोधित करीत होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले- दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध होतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामाचा खर्च कमी करणे शक्य आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करताना आम्ही वाया गेलेले प्लास्टिक, रबर, टायरचे तुकडे यांचा वापर करीत आहोत. यासंदर्भात महामार्ग मंत्रालयाने मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. तसेच उड्डाणपूल बांधताना स्टील फायबरचा वापर आम्ही करीत आहोत. 30 ते 40 टक्के या तंत्राचा वापर केला जात आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
बांधकाम करण्यापूर्वी जे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केले जातात, ते चांगल्या पध्दतीने बनविले जावे. अचूक डीपीआर तयार झाले तर बांधकाम चांगल्या दर्जाचे होते, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ई टेंडरिंग पध्दतीचा अवलंब प्रकल्पांसाठी अत्यंत योग्य आहे. यामुळे पारदर्शकता आणि प्रकल्पांना गतिशीलता येते. तसेच प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापरही केला पाहिजे. स्टील आणि सिमेंट उद्योग सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा फायदा घेत असताना वाया जाणारे प्लास्टिक, रबर व अन्य वस्तूंचा रस्ते बांधकामात उपयोग करणे म्हणजे खर्चात बचत करणे होय. तसेच दुमजली उड्डाणपुलाची पध्दत आता आली आहे. भारतीय महामार्ग विकास प्राधिकरणाने नुकताच राजस्थानमध्ये वाहने व विमानासाठी एअरस्ट्रीप तयार केली आहे. अशा 19 एअरस्ट्रीप देशात तयार केल्या जाणार आहे. या रस्त्यावर विमान उतरविणेही शक्य होणार आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
सिव्हिल इंजिनीअरिंग शाखेची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अभियंत्यांमुळेच महामार्ग प्राधिकरणाने एका दिवसात अडीच किमी सिमेंट रोड बांधण्याचा व एका दिवसात 25 किमीचा डांबरीकरण रस्ता बांधण्याचा जागतिक विक्रम केला आहे. बांधकामात नवीन तंत्रज्ञानाला नेहमीच आपण प्रोत्साहन देत असतो, असेही ते म्हणाले.
वाचनामुळेच व्यक्तित्त्वाचा विकास : ना. गडकरी
जीवनाला प्रेरणा देणारी अनेक गतकालीन पुस्तके आजही उपलब्ध आहेत. या पुस्तकांतून राष्ट्रीय पुरुषांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा विचार यांचा परिचय होतो. वाचनामुळेच व्यक्तित्वाचा विकास होतो. गतकालीन इतिहासातून प्रेरणा घ्यायची असेल तर त्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ग्रंथालय भारतीच्या ‘वाचनातून विकास’ या विषयावर एका आभासी कार्यक्रमातून ते संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले- चांगले भाषण ऐकल्यानंतर मनावर जसा परिणाम होतो, तसेच चांगले पुस्तक वाचल्यानंतरही त्याचा मनावर चांगला परिणाम होतो. समाजाचे प्रबोधन आणि प्रशिक्षण दोन्ही पुस्तकांमुळे होते. पुस्तकांमुळे ज्ञानाचा प्रसार होतो, अशी पुस्तके जतन करून ती लोकांपर्यंत कशी पोहाचवता येतील असा प्रयत्न केले जावे, असेही ते म्हणाले.
पुस्तकांच्या किंमतीही आता वाढल्या आहेत. सर्व प्रकारची पुस्तके वाचण्यास उपलब्ध व्हावी म्हणून अभ्यासिका, वाचनालये व डिजिटल लायब्ररी उपलब्ध होणे आता महत्त्वाचे आहे. जगातील नवीन व आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रातही वापरले जावे. कारण पुस्तक वाचणे शेवटी महत्त्वाचे असते. काळाच्या ओघात या क्षेत्रानेही आता बदल स्वीकारला पाहिजे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- टीव्ही व त्यावरील मालिकांमुळे वाचनाचा कल आता कमी होतो आहे. वाचनाला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी वॉर्डावॉर्डात अभ्यासिका, वाचनालये व डिजिटल लायब्ररी सुरु व्हावी. समाजाच्या सहकार्याने वाचनाची चळवळ अधिक गतिशील व्हावी. वाचनाचे प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रंथालय भारतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.
दिनेश दमाहे
9370868686