‘सेल्फी विथ तिरंगा’ स्पर्धेचे बक्षिस वितरण
नागपूर :- देशाच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि विकासासाठी अग्रेसर करण्याच्या मार्गावर अधिक पुढे येण्यासाठी सर्वानी मिळून कार्य करायला हवे आहे. तसेच राज्य शासनाच्या नागपूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांबद्दल नागरिकांनी स्वतःहुन इतरांना प्रोत्साहित करून स्वच्छता व विकासाचे दूत व्हा, असे आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी.यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) रोजी ‘सेल्फी विथ तिरंगा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर, 2022 सेवा पंधरवाडाचे औचित्य साधून गुरुवारी (२२ सप्टेंबर) रोजी या स्पर्धेच्या विजेत्यांना मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त तथा संचालक (माहिती व तंत्रज्ञान) महेश धामेचा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे स्वप्नील लोखंडे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी व स्पर्धेचे विजेते उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्पर्धेच्या विजेत्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनपाद्वारे विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. सेल्फी विथ तिरंगा सारख्या उपक्रमातून आपण एका चांगला संदेश दिला आहे. स्पर्धेत सहभागी सर्वांनी नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. विशेषतः विजेत्यांनी आपल्याला स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता शहराच्या विकासाचे ब्रँड अँबेसिडर व्हायला हवे. नागपूर मनपा तर्फे प्लास्टिक बंदी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करा आणि शहराच्या विकासासाठी इतर नागरिकांना प्रोत्साहित करायला हवे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी विजेत्यांना केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका हद्दितील रहिवासी असलेल्या ७५ वर्षावरील आणि ७५ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी स्वातंत्र्यदिनी सेल्फी विथ तिरंगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी आपल्या घरावर लावलेल्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो फोटो नागपूर महानगरपालिकेच्या सोशल मीडियाला टॅग करण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार, नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व विविध वयोगटातील नागरिकांकडून सेल्फी अपलोड करण्यात आल्या. त्यापैकी उत्कृष्ट, सुस्पष्ट अशा सेल्फीची पुरस्कारांकरिता निवड करण्यात आली. यामध्ये एकूण ३ वयोगट करण्यात आले होते. यातील वयोगट २ ते १२ गटात प्रथम पारितोषिक सौम्य विंचूरकर, द्वितीय पारितोषिक फिझा खान, तृतीय पारितोषिक यथार्थ लोखंडे यांना तर प्रोत्साहनपर पारितोषिक युती राकेश कदम, ओजस्विनी मोहन मासुरकर, यश धर्मेंद्र जाधव, आराध्या उमेश झाडे, ओवी काळे यांना देण्यात आले. तर वयोगट १२ ते ७५ या गटातील प्रथम पारितोषिक राहुल गुप्ता, द्वितीय पारितोषिक संदेश सिंगलकर, तृतीय पारितोषिक डॉ. सामिया मोहम्मद यांना तर प्रोत्साहनपर पारितोषिक अक्षय मर्जीवे, अंजया अन्नपार्थी, पिंकी टंडन, नितीन निमजे, विशाल नाईक, वयोगट ७५ व त्यावरील गटात प्रथम पारितोषिक वसंतराव अयाचित, द्वितीय दिवाकर भोयर, तृतीय बिसनराव खेडीकर यांना तर प्रोत्साहनपर पारितोषिक पुष्पा देशपांडे, राजकुमारी जैन, सुनीककुमार नायडू यांना प्रदान करण्यात आले.
सर्व विजेत्यांना मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी ७५ वर्षावरील गटातील विजेते वसंतराव अयाचित यांच्या कुटुंबीयांनी मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसाकरीत अशा स्पर्धांमुळे नागरिकांमध्ये होणाऱ्या जण जागृती बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आई.टी.सहाय्यक राज चौधरी यांनी केले.