– महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात परिसंवादांची भूमिका मोलाची – मंत्री आदिती तटकरे
मुंबई :- आर्थिक साक्षरतेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सकारत्मक निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांना आर्थिक गुंतवणूक कशी करावी अत्याधुनिक साधनांचा दैनंदिन व्यवहारात वापर कसा करावा, यासाठी सशक्ती परिसंवाद 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात अशा परिसंवादांची भूमिका नक्कीच मोलाची ठरणार आहे, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
लर्निग लिग फाऊंडेशन, मार्स्टर कार्ड आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सशक्ती परिसंवाद 2024-25 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. या वेळी खासदार नारायण राणे, माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा लड्डा, लर्निंग लिग फाऊंडेशनच्या अध्यक्ष नुरीया अन्सारी, मार्स्टर कार्डचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक शरदचंद्रण संग्राम, पुनीत तळोजा यांच्यासह अनेक बचत गटांच्या महिला प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित होत्या.
या परिसंवादात महिलांशी संवाद साधतांना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांना शिक्षणाबरोबरच आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहित करण्यात येत आहेत. यासाठी राज्यातील जास्तीत जास्त महिलांना आर्थिक साक्षर करणे हे महत्वाचे उद्दिष्ट विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे. बचतगटांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसायाबरोबरच मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावर महिलांना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहेत. मोबाईलमुळे मोठी क्रांती झालेली आपल्याला पहावयास मिळते. मोबाईलसारख्या गॅझेटच्या माध्यमातून आर्थिक देवाण घेवाण करतांना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी महिलांना अशा परिसंवादाच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण करतांना कशा प्रकारे आपण खबरदारी घेतली पाहिजे याविषयी परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली असून सात राज्यात महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. या सुवर्णकाळात साधारणपणे 20 लाख महिला माविमसोबत जोडल्या गेल्या असून भविष्यात किमान 50 लाख महिलांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून अनेक महिला अर्थिक साक्षर होतांना दिसून येत आहे हेच या योजनेचे मोठे यश आहे. महिलांना आर्थिक देवाण घेवाण करण्याकरिता विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा छायाचित्र असणारे रुपे क्रेडीट कार्ड देखील उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम होण्याचा निर्धार करावा : खासदार नारायण राणे
देशात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षम होण्याचा निर्धार. यामुळे कुंटुबाला आर्थिक हातभार तर लागेलच परंतू निर्णय घेण्याचे स्वातंत्र देखील मिळणार आहे. महिलांनी सूरू केलेल्या उद्योग व्यसायामुळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन सदैव महिलांच्या पाठीशी उभे असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
सशक्ती परिसंवाद कार्यक्रमाचे प्रस्ताविक माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा लड्डा यांनी केले. यावेळी प्रातिनिधक स्वरूपात उपस्थित असणाऱ्या महिलांना धनादेश आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. परिसंवाद कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या बचतगटांच्या स्टॉलला मंत्री अदिती तटकरे, खासदार नारायण राणे यांनी भेट दिली.