तीन दिवसीय ‘आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे नागपूरमध्ये आयोजन
नागपूर :-आयुर्वेद – या प्राचीन वैद्यक पद्धतीला वैज्ञानिक पुराव्याद्वारे 21 व्या शतकात प्रस्थापित करण्यावर आपला भर असला पाहिजे यासाठी संशोधन आणि विकास यामध्ये भरीव कार्य होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात जे विद्यार्थी, संशोधन, निर्माते, वैद्य आहेत त्या सर्वांनी एकत्रितपणे भविष्यात असा कार्यक्रम आखावा ज्यामुळे विश्वात नेतृत्व करू शकू अशी अपेक्षा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज नागपूरात व्यक्त केली. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय ‘आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पूर्व नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोनोवाल बोलत होते. या कार्यक्रमाला, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांची उपस्थिती होती.
2014 च्या आधी आयुष हा एक विभाग होता परंतु 2014 नंतर या विभागाचे मंत्रालय झाल्यानंतर आयुषने देशभरात स्वतःची ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे .’हर दिन, हर घर आयुर्वेद’ या मोहिमेच्या माध्यमातून जनसंवाद, जनभागीदारीद्वारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ राहील असा प्रयत्न मंत्रालयाचा असल्याचेही सोनोवाल यांनी सांगितल.
येत्या काळात केंद्र शासनाच्या एम्समध्ये आयुर्वेदीक उपचार आणि आधुनिक पद्धतीचा उपचार दोन्ही एकाचवेळी उपलब्ध असावा असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सर्वानंद सोनोवाल यांनी या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. याप्रसंगी आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा उपस्थित होते.
आयुर्वेदाला जागतिक अधिष्ठान मिळण्यासाठी आयुर्वेदाची प्रॅक्टिस ही शुद्ध स्वरूपात होणे गरजेचे आहे. जगभरातून आयुर्वेदाला मागणी मिळाल्यास त्याला आपोआपच राजाश्रय मिळेल. यासाठी आयुर्वेदाला पुढील 25 वर्षात वैश्विक अधिष्ठान प्राप्त करण्याचा संकल्प करावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी केलं.
महाराष्ट्रापासून सुरू झालेले आयुर्वेद व्यासपीठचे कार्य देशभरात पसरलेले आहे. आयुर्वेदाला अच्छे दिन आले आहेत , असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
उद्या रविवार, 13 नोव्हंबर रोजी सकाळी 11.30 केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या तीन दिवसीय परिषदेचा समारोप होईल. या परिषदेत वैशिष्ट्यपूर्ण असा बाह्य रुग्ण विभाग असून यात 13 नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 4 ते 7 वाजेदरम्यान भारतभरातून आलेले निष्णात आयुर्वेद चिकित्सक नि:शुल्क रुग्ण सेवा देत आहेत. या परिषदेला देशभरातील सुप्रसिद्ध वैद्य, कुशल चिकित्सक, विद्वान आयुर्वेद शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.