– संविधानाची पायमल्ली करणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘त्या’ निर्णयाचा निषेध नोंदवून लोकांना करणार जागृत
नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला पायदळी तुडवित २५ जून १९७५ रोजी देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक अभियान २५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व जिल्हा स्तरावर जनजागृती प्रबोधनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अभियानाचे संयोजक प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
२५ जून १९७५ रोजी देशात लागू झालेली आणीबाणी म्हणजे देशातील व्यक्तीस्वातंत्र्यावर हा एक मोठा आघात होता. भारतीय संविधानावरच मोठा प्रहार होता. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी व जनतेपुढे सत्य यावे, या हेतूने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीतर्फे ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक “विशेष अभियान” हाती घेण्यात आलेले आहे.
या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यात भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ उपेंद्र कोठेकर, चैनसुख संचेती, प्रा. संजय भेंडे , प्रा. अनिल सोले, प्रा. श्रीकांत देशपांडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, शिवराय कुलकर्णी, सीए मिलिंद कानडे, गिरीश व्यास, जयंता डेहणकर, विदर्भातील विविध जिल्ह्यात आणीबाणीचे क्रुर सत्य जनतेपुढे मांडतील. काँग्रेसकडून समाजामध्ये जे मनभेद आणि मतभेद निर्माण केले आहेत, संविधान बदलण्याचे जे नरेटिव काँग्रेस ने तयार केलेले आहे, त्याबाबत नागरिकांना जागरूक केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर आयोजित या प्रबोधन कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून देशातील काळ्या दिवसाचे सत्य जाणून घ्यावे, असे आवाहन समन्वयक धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.
इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ साली आणीबाणी जाहीर करून आपल्या हुकूमशाही शासनपद्धतीने जनतेला वेठीस धरले. भारतीय संविधानाच्या ४२व्या घटनादुरूस्तीने नागरिकांच्या मुलभूत अधिकारावरच प्रहार केला. भारतीय संविधानात केलेल्या दुरूस्तीमुळे त्यात न्यायालय देखील हस्तक्षेप करू शकणार नाही, अशी तरतूद केली. मुळात हे देशाचे संविधानच संपविण्यासाठी केलेला कपोलकल्पीत प्रयत्न होते. अशा पद्धतीचे शासन करून जनतेला गुलाम बनविण्याची मानसिकता आजही काँग्रेस आणि त्यांच्या धुरीणांमध्ये दिसून येत आहे. त्याबाबत नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. काँग्रेसच्या आणीबाणीच्या काळ्या इतिहासाबाबत जागृत होउन पुढील धोका ओळखून घेण्यासाठी भाजपच्या ‘आणीबाणी एक काळा दिवस’ या प्रबोधन अभियानात सामील होण्याचे आवाहन संयोजकांद्वारे करण्यात येत आहे.