नागपूर :- एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र हातमाग विणकरांना अर्ज करण्याचे आवाहन, वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी केले आहे.
राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि हातमाग विणकरांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 2 जून 2023 रोजी शासन निर्णयाद्वारे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 जाहीर झाले आहे. या धोरणानुसार पात्र हातमाग विणकरांच्या कुटुंबांना प्रतिमहिना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल. तसेच, पाच पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता देण्यात येईल. राज्यातील पाच पारंपरिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट डिझाईनचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार करण्यात येईल. याचप्रमाणे हातमाग विणकरांसाठी या धोरणांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
2018 मध्ये हातमाग गणना पार पडली. यानंतर सर्वेक्षणही करण्यात आले. या सर्वेक्षणात काही विणकरांचे नावे नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर पात्र विणकरांना शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी पात्र विणकरांनी पा्रदेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्र. 2, बी. विंग, 8 वा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.