नागपूर :- रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 रुपयांची वीज चोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली असून सोबत तडजोडीच्या रकमेपोटी 13 लाख 10 हजाराच दंड देखील ठोठविण्यात आला आहे. संपुर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताज राईस मिलचे शफ़िक रीर अंसारी याच्याविरोधात रामटेक पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003, सुधारीत 2007 च्या कलम 151 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
30 डिसेंबर 2024 रोजी महावितरणच्या नागपूर शहर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे हे दुपारी 4.45 च्या सुमारास त्यांचे सहकारी सहायक अभियंता एन. आर. बागडे, सहयक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी व्ही. एस. बिसने, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. आर. यादव व मुमारी व्हि. के बारलिंगे यांचेसह देवलापार येथील ताज राईस मिलचा विजपुरवठा व संच तपासणी करण्याकरिता गेले असता तेथे विज वापराची नोंद होण्यासाठी असलेल्या थ्री फेजच्या औद्योगिक विजमिटरला आणि मिटर टर्मिनल कव्हरला सुद्धा सील नव्हते. ही राईस मिल पुर्ण लोडवर सुरु असतांनाही विजमिटरच्या डिस्प्लेवर कमी वापर दिसत होता. सबब, सदर विजमिटरला येणारी इनकमिंग सर्विस केबलची पाहणी करून या इनकमींग केबलला जोडलेला ट्रान्सफॉर्मरच्या डिस्ट्रीब्युशन बाक्सच्या जागी करंट मोजले असता सुरु असलेल्या वापरा प्रमाणे करंत दिसत होता. सर्विस केबलला दोन ठिकाणी जोड दिसत होता. सर्विस केबल व मिटरच्या डिस्प्ले वरील करंट मध्ये तफावत असल्याने या विजमिटरला येणा-या केबलची तपासणी केली असता या मिटर रूमच्या मागील खोलीत या इनकमिंग सर्विस केबलला अतिरिक्त केबल जोडल्याचे निदर्शनास आले व या केबल द्वारे संपूर्ण राईस मिलचा विजपुरवठा चालू असल्याचे निदर्शनास आले. या अतिरिक्त जोडलेल्या केबलवर देखिल सुरु असलेल्या वीज वापरा प्रमाणे करंट दिसत होता. मात्र या विज वापराची नोंद मिटर मध्ये होत नव्हती.
या सर्व प्रकाराची योग्य शहानिशा करून ग्राहकाने अवैधरीत्या विज पुरवठा घेत मागील 12 महिन्याच्या कालावधीत 4 लाख 90 हजार 32 विज युनिटचा अवैध वापर करून रूपये 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 चे महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भारतीय विज कायदा 2003 सुधारित 2007 कलम 135 अन्वये ताज राईस मिलचे शफ़िक रीर अंसारी याचेविरोधात रामटेक पोलीस ठाण्यात विजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय विज कायदा 2003 सुधारित 2007 चे कलम 152 प्रमाणे तडजोडीची रक्कम म्हणून 13 लाख 10 हजाराचा दंड असे एकूण 1 कोटी 15 लाख 33 हजार 894 रुपयाचे देयके आकारण्यात आले आहे.
सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागा अंतर्गत कार्यरत नागपूर शहर भरारी पथकाने विदर्भातील आजवरची सर्वात मोठि वीज चोरी उघडकीस आणण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अपर्णा गिते (म.पो.से), नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, सुरक्षा व अंमजबावणी विभागाच्या नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुनिल थापेकर यांच्यासह अनेकांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे आणि त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन केले आहे.