संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध पावलेल्या कढोली गावात मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ग्रामस्थांच्या नाकी नऊ आले असले तरी विजेच्या लपंडावाची समस्या सुटता सुटेना अशी झाली आहे.सद्या सुरू झालेला पावसाळा, उद्यापासून होणाऱ्या मुलांच्या शाळा, शेतकऱ्यांची शेती कामे या सर्व कामावर विजेच्या समस्यांचा विपरीत परिणाम पडणार आहे त्यामुळे कढोली गावात अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कढोली गावात विजेची समस्या गंभीर होत चालली आहे. दिवसातून दहा वेळा वीज जाणे येणे सुरू असते यामुळे ग्रामस्थ वैतागले असून नेमकं कशामुळे ही समस्या निर्माण होते हे विद्दूत कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नसून ग्रामस्थासाठी मोठी डोकेदुखी आहे.सध्या पावसाळयाचे दिवस आहेत.त्यासाठी सुरक्षात्मक दृष्टिकोनातून वीज असणे आवश्यक आहे.तेव्हा वारंवार होणारी विद्दूत खंडित सेवा लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी कढोली ग्रा प च्या माजी सरपंच प्रांजल वाघ, व गावकऱ्यांनी केली आहे.