संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी-मौदा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिवाळी प्रित्यर्थ स्नेह भेटीच्या नावाखाली पैसे,मद्य तसेच मोफत वस्तू वाटप होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी भरारी पथकानी सतर्क राहून या बाबीवर लक्ष ठेवावे तसेच निवडणूक ह्या कोणत्याही प्रभावाखाली न होता निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणुकीत नियुक्त सर्व यंत्रणांनी खर्च पथकाला वेळोवेळी माहिती द्यावी व अवगत करावे असे निर्देश कामठी मौदा विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षक दीपक आनंद यांनी आज कामठी तहसील कार्यालयात भेट देत निवडणूक यंत्रणेला दिले.
याप्रसंगी जिल्हा नोडल अधिकारी सीमा नहोरे,कामठी विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश जगदाडे, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर,नोडल अधिकारी संदीप बोरकर,कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले,नायब तहसीलदार मयूर चौधरी, नायब तहसीलदार उपेश अंबादे आदी उपस्थित होते.दरम्यान निवडणूक खर्च निरीक्षक दीपक आनंद यांनी उपस्थित सर्व निवडणूक यंत्रणा अधिकाऱ्याशी खर्च आढावा घेत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहिता कक्ष,एक खिडकी योजना,परवानगी कक्ष आदींची पाहणी करून विविध बाबींचा आढावा घेतला.तसेच आजनी मार्गावरील स्थिर निगराणी पथकास भेट देऊन भरारी पथक ,खर्च पथक ,आचार संहिता पथक,परवानगी कक्ष चा सविस्तर आढावा घेतला व निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने का म करावे, परवांनग्यासाठी सुविधा ऐप,तसेच तक्रारीसाठी सि व्हिजल ऐप द्वारे काम करावे असे निर्देशित केले.