काश्मीर ची निवडणूक व डावपेच ! 

जम्मू काश्मीर ची निवडणूक घोषित झालीय. टीचभर काश्मीर पुन्हा देशभर होईल. सोबत हरयाणा ची निवडणूक आहे. ती अनुल्लेखात जाईल. जम्मू काश्मीर मात्र चर्चेत असेल. हिंदू मुस्लिम तडका तिथे आहे. तडका पुन्हा खमंग होईल.

मतदान तीन टप्प्यात आहे. १८, २५ सप्टेंबर व १ आक्टोबर. केवळ ९० जागांसाठी तीन दिवस मतदान कां याचे ठोस उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचे टाळले. तेव्हढ्याच ९० जागांची हरयाणा विधानसभा निवडणूक मात्र, १ आक्टोबर ला होणार आहे.

जम्मू काश्मीर व हरयाणा या दोन्हींची मतमोजणी एकाच दिवशी ४ आक्टोबर ला होईल.

घडामोडी वेगाने घडत आहेत. आधी वाढलेल्या विधानसभा जागांकडे लक्ष द्यावे. नव्या फेररचनेत जम्मुच्या ६ आणि काश्मीरची १ अशा ७ जागा वाढल्या आहेत. आधी विधानसभा जागा ८३ होत्या. आता ९० झाल्या.

या ९० जागांपैकी ७४ जागा खुल्या वर्गात आहेत. उरलेल्यात ७ जागा अनुसूचित जाती व ९ जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. एकूण मतदार ८७ लाख आहेत. यापैकी ३.७ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत

सध्या जम्मू काश्मीर केंद्रशासित आहे.‌ या राज्याचा विशेष दर्जा (३७० व ३५ अ) आणि स्वतंत्र राज्य दर्जा (Statehood) दोन्ही काढून टाकण्यात आलेय. एखाद्या स्वतंत्र राज्याला केंद्रशासित करण्याचे असे स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच घडले.

जम्मू काश्मीर राज्य ५ लोकसभा क्षेत्राचे आहे. त्यातील २ जम्मूत व ३ काश्मीर मध्ये आहेत. जम्मुच्या दोन्ही जागांवर भाजपा जिंकली. काश्मीरमध्ये भाजपने उमेदवार दिलाच नव्हता. तिथे १ निर्दलीय व २ नॅशनल कॉन्फरन्सकडे आहेत.

जम्मू हिंदूबहुल व काश्मीर मुस्लिमबहुल क्षेत्रे आहेत. नव्या परिसीमनानंतर विधानसभेच्या जम्मू भागात ४३ व काश्मीर खोऱ्यात ४७ जागा झाल्या आहेत

ताजी बातमी अशी की संघाने या निवडणुकीत लक्ष घातलेय. संघाचे राम माधव यांना काश्मीर चे निवडणूक प्रभारी भाजपला करावे लागले.

विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचेशी राम माधव यांचे फारसे पटत नाही.

कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच काश्मीर दौरा केला. सोबत मल्लिकार्जुन खरगे हे होते. याच दौऱ्यात कांग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी झाली.‌ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक आम्ही मिळून लढू असे फारुख व ओमर अब्दुल्ला यांनी जाहीर केले.

दुसरीकडे पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.‌ मुलगी इल्तिजा मुफ्ती हिला उत्तराधिकारी घोषित केले. इल्तिजा ही उच्चशिक्षित आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बीजबेहडा मतदार संघातून लढण्याचे तिने घोषित केले.

वेगाने घडामोडी घडत आहेत. जम्मू काश्मीर निवडणुकीत डावपेच महत्त्वाचे ठरतील अशी चिन्हे दिसतात.

जम्मू भागात ६ विधानसभा जागा वाढल्या हा पहिला डाव भाजपने जिंकला. हिंदू मतांवर काश्मीरवर राज्य करण्याचे भाजपचे योजन दिसते. त्या तुलनेत जम्मू त कांग्रेस दुबळी आहे.

४ आक्टोबर ला मतमोजणी आहे. तेव्हाच सारे स्पष्ट होईल.

– रणजित मेश्राम

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

३७० हटवून ५ वर्षे झाली .., मग .. ? 

Sun Sep 1 , 2024
३७० कलम विरुद्ध देशभर दणदण दवंडी पिटली गेली. मात्र, काढतांना ते काढले गुपचूप ! या काढण्याला या ५ आगस्टला ५ वर्षे पूर्ण झाली. देशभर पंचवार्षिक जल्लोष करायचा. ते टाळले. प्रत्येक वेळी उर्वरित देशाचे (rest of India) राजकीय मतनिर्धारण (political opinion) समोर ठेवून दवंडी पिटायची. ती पिटली. लोकांनाही वाटायचे, ३७० काहीसे ‘भयंकर’ असेल ! प्रत्यक्षात ते काय होते ? काय घडले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!