संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तर्फे ‘एक वही एक पेन’उपक्रमा अंतर्गत परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन
कामठी :- 14 एप्रिल परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी तर्फे संयोजक राजेश गजभिये,प्रमोद खोब्रागडे, काशिनाथ प्रधान, अविनाश उकेश, आनंद गेडाम, विकास रंगारी, आशिष मेश्राम ,गीतेश सुखदेवें यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी येथील लिबर्टी कॉम्पेटीटीव्ह क्लासेस तर्फे जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राबवित असलेल्या ‘एक वही एक पेन’ या सामाजिक उपक्रमात सहभागी होत स्पर्धात्मक परिक्षेच्या पुस्तकांचा संच देऊन परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन वाहण्यात आले. तसेच हरदास वाचनालय, जिजाऊ वाचनालय, प्रबुद्ध सांस्कृतिक संघ वाचनालय ला सुद्धा पुस्तक भेट देण्यात आले.
याप्रसंगी लिबर्टी कॉम्पेटीटीव्ह क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी सांगितले की ‘एक वही एक पेन’ हा सामाजिक उपक्रम अत्यंत साधा वाटत असला तरी या संकल्पनेचे अत्यंत व्यापक सकारात्मक परिणाम आम्ही गेली नऊ वर्षे अनुभवले आहेत. ही संकल्पना प्रचंड यशस्वी झाली आहे. व यातून अतिशय चांगल्या पध्दतीने आंबेडकरी विचारांची सामान्यजनांस माहिती झाली आहे. भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध असेल असे स्वता: बाबासाहेब सांगून गेले आहेत.आज भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावीपणे शक्य होत नाहीये. त्याकरिता अनेक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार हा पालक वर्ग असलेला विद्यार्थी आम्ही शैक्षणिक सुविधाअभावी हिरमुसून जाताना अनुभवला आहे. एकीकडे अभिवादनपर हाराफुलांचा खच पडतो आहे आणि दुसरीकडे आपले उद्याचे देशाचे भविष्य कोमेजून जाताना पाहणे अत्यंत वेदनादायक होत आहे.आणि यातूनच एक वही एक पेनची संकल्पना जन्म घेते. या संकल्पनेनुसार, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण किमान २० रुपयांचा हार-फुल घेतो त्याला पूर्णपणे बाॅयकाॅट करुन त्याच मूल्याचे ‘एक वही व एक पेन’ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून आमच्याकडे जमा करा, आम्ही ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू. त्यांच्या शिक्षणाला तुमच्या वतीने हातभार लावू. ते विद्यार्थी शिक्षित होतील. आयुष्यात मोठ्या पदांवर विराजमान होतील. बाबासाहेबांचे उच्चशिक्षित समाजाचे स्वप्न पूर्ण करतील.हेच आमचे ध्येय असून याच ध्येयपूर्तीतून कामठी येथील लिबर्टी कॉम्पेटीटिव्ह क्लासेसचे विद्यार्थी संघ ‘एक वही एक पेन’हा सामाजिक उपक्रम मागील नऊ वर्षापासून सातत्याने राबवित आहे ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे.
मागील नऊ वर्षांपासून सातत्याने “एक वही आणि एक पेन” हा समाजहितार्थ उपक्रम कामठी शहरातील लिबर्टी कॉम्पेटीटीव्ह क्लासेसचे तरुण-तरूणी राबवत असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचक्र अनूवर्तन दिन,डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आदी दिवशी या सामाजिक उपक्रमातून एक वही एक पेन संकलित करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.या वर्षी सुध्दा 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना फुले वाहण्यापेक्षा एक वही एक पेन देऊन बाबासाहेबांच्या उरलेल्या कार्याला समाप्ती कडे नेण्याचा सामाजिक दायित्व साकारण्याची जवाबदारी स्वीकारण्याचा संदेश देण्यात आला.
प्रत्येक माणूस ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाला काही तरी देणे आहे ही त्याची सामाजिक दायित्वाची जवाबदारी आहे तेव्हा ‘एक वही एक पेन’या सामाजिक उपक्रमातुन समाजाने केलेली मदत शाळेत जावून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न लिबर्टी कॉम्पेटीटिव्ह क्लासेस चे विद्यार्थी करीत आहेत , गरजू विद्यार्थ्यांचं समाधान व्हाव हेच लिबर्टी कॅम्पेटोटिव्ह क्लासेस चे अंतिम ध्येय आहे.आणि याच उपक्रमाला प्रभावित होऊन कार्यरत असलेल्या लिबर्टी कॉम्पेटीटिव्ह क्लासेस च्या समस्त विद्यार्थी संघाचे कौतुक करीत एक वही एक पेन या उपक्रमात प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट ने सक्रिय सहभाग नोंदविला.