हिंगण्यामध्ये दहा वर्षांत आठ हजार कोटींची कामे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– काँग्रेसने साठ वर्षांत रस्तेही बांधले नाहीत

नागपूर :- गेल्या दहा वर्षांमध्ये हिंगणा मतदारसंघात आठ हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. पुढील दोन महिन्यांमध्ये एक हजार कोटी रुपयांची नवीन कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती देतानाच केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. साठ वर्षे देशात सत्ता असताना काँग्रेसने साधा खेड्यांमध्ये जाणारे रस्तेही बांधले नाहीत, अशी टीका ना. गडकरी यांनी केली.

हिंगणा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारार्थ टाकळघाट आणि बुटीबोरी येथे ना. गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, माजी आमदार नाना श्यामकुळे, सागर मेघे, आशीष उमरे, हरीषचंद्र अवचट, धनराज आष्टनकर, प्रदीप ठाकरे, किशोर माथनकर, वैशाली केळकर, नत्थुजी कावरे, उमेश कावडे, नगराध्यक्ष बबलू गौतम, अविनाश गुजर, विनोद सादगे, विनोद लोकरे, अनिल ठाकरे, मुन्ना जयस्वाल, दिलावर खान, महेंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. गडकरी म्हणाले, ‘बुटीबोरी परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग आले. इंटरनॅशनल लॉ स्कुल, ट्रिपल आयआयटी आले. चार हजार कोटी रुपयांचा रिंग रोड पूर्ण झाला. या भागाचा नव्याने विकास होत आहे. मिहानचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आहे. उत्तम रस्ते झाले. या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बर्ड पार्क झाले. बुटीबोरीला साडेचारशे कोटींचा मदर डेअरीचा प्लान्ट सुरू होणार आहे. पुढील दोन वर्षांत बुटीबोरीला मेट्रो पोहोचणार आहे.’

कोरोना काळात मोठे योगदान

दत्ताभाऊ मेघे आणि समीर यांनी खूप मोठे काम केले आहे. दोघांनाही विनंती करायचो की हिंगण्याला मोठे मेडिकल कॉलेज सुरू करा. एकदिवस त्यांनी निर्णय घेतला आणि पुढे कोरोना काळात त्याच मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. हजारो गोरगरिबांचे प्राण वाचविण्याचे काम केले. त्याचे श्रेय समीर मेघे यांना आहे, या शब्दांत ना. गडकरी यांनी कौतुक केले.

आमच्यावर जातीय राजकारणाचे संस्कार नाहीत

आमच्यावर संविधान बदलाचे आरोप झाले. पण आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी संविधानाची पायमल्ली केली. संविधान तोडण्याचे पाप काँग्रेसचे आहे. पण उलटा चोर कोतवाल को डाटे, अशी परिस्थिती आहे. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचा प्रचार आमच्याविरोधात केला. पण आमच्यावर जाती-पातीचे राजकारण करण्याचे संस्कार नाहीत. जातीयवादाचे वीष पसरविण्याचे काम काँग्रेसने केले. संविधान कधीही बदलणार नाही आणि बदलू देणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो, असेही ना. गडकरी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला व मुलींसाठी ‘आपली-बस’ही करणार मोफत - विकास ठाकरे यांचा संकल्प

Mon Nov 11 , 2024
–  पश्चिम नागपुरात ‘मविआ’चा प्रचार शिगेला  नागपूर :- महायुती महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ते रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आणणे ही काळाची गरज आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर, महिला आणि मुलींसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात येणार. तेलंगणात काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर ही यशस्वीपणे लागू केली आहे. आता तेलंगणाच्या धरतीवर नागपुरात महिलांसाठी आणि मुलींसाठी आपली बस (सिटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com