मुंबई :- “विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत आणि आदर्श जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ब्रिटिश कौन्सिलचे निदेशक राशी जैन यांनी आज मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी ब्रिटिश कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जागतिक पातळीवर स्टार्टअप, नवीन संशोधन, इनोव्हेशन याला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना अधिक कुशल करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. या करारामुळे नवीन संशोधनाला चालना मिळेल आणि कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होईल.तसेच परदेशी विद्यापीठाकडून महाराष्ट्रातील विद्यापींठाना शैक्षणिक सहकार्य मिळेल,” असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
रस्तोगी म्हणाले की, महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांचे जागतिकीकरण व्हावे, ही शासनाची भूमिका आहे.या करारामुळे भारत आणि युके यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक वाढेल आणि नवीन शैक्षणिक संधी अधिक निर्माण होतील. विद्यार्थ्यांना संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
ब्रिटिश कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई म्हणाले की, महाराष्ट्रासोबत केलेल्या या करारामुळे भारत आणि युके या दोन देशांमधील शैक्षणिक संबंध अधिक दृढ होऊन जागतिक आव्हानांचा सामना करण्यास यामुळे मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचा अनुभव आणि रोजगारक्षमता सुधारणे आणि यातून महाराष्ट्रासाठी चांगले सामाजिक – आर्थिक भविष्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
ब्रिटिश कौन्सिलचे राशी जैन म्हणाले की, उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांना नवीन कौशल्य व तंत्रज्ञानासह उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रासोबत हा करार केला आहे.