– नागपूर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी
– दिड तास गाडीला उशिर
नागपूर :-संघमित्रा एक्सप्रेसच्या शौचालयाचे दार बर्याच वेळपासून बंद असल्याने प्रवाशांना शंका आली. रेल्वे कर्मचार्यांच्या मदतीने दार तोडताच एक व्यक्ती बेशुध्दावस्थेत आढळला. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही घटना गुरूवार 18 मे रोजी सकाळी 8.50 वाजेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा यावेळी होती. या घटनेमुळे गाडीला दिड तास उशिर झाला.
12295 बेगळुरू दानापूर संघमित्रा एक्सप्रेस आपल्या निर्धारीत वेळेत म्हणजे सकाळी 8.38 वाजता नागपूर स्थानकाच्या प्लॅटफार्म नंबर एकवर आली. तत्पूर्वी गाडीच्या मागच्या जनरल डब्यातील शौचालयाचे दार बर्याच वेळपासून बंद होते. प्रवाशांनी दार उघडण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, प्रयत्न करूनही दार उघडत नाही.
या घटनेची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एएसआय विजय मरापे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश मिळाले नाही. अखेर उपस्टेशन व्यवस्थापकांनी कॅरीज अॅण्ड वॅगन (सीएण्ड डब्ल्यू) कर्मचार्यांना बोलाविले. त्यांनीही दार उघडण्याचा प्रयत्न केला. अखेर सब्बल आणि इतर लोखंडी साहित्याने दार तोडले. दारापुढे एक व्यक्ती बेशुध्दा वस्थेत पडून होता. त्याचे शरीर वजनी आणि कडक झाले होते. मरापे यांनी त्याला बाहेर काढले. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एपीआय खरात यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
मृतकाजवळ मिळाला आधार कार्ड
लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता मृतका जवळ एक कागद मिळाला. त्यावर मोबाईल नंबर होते. त्यावरून पोलिस मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत होते. मृतकाजवळ एक आधार कार्ड मिळाला. त्यावर रामसेवक भुईया, रा. बिहार असे नाव आहे. शवविच्छेदनासाठी मेयो रूग्णालयात पाठविण्यात आले.
डब्यात क्षमतेच्या दुप्पट प्रवासी
एका डब्याची क्षमता 72 प्रवाशांची असते. मात्र, या डब्यात (201779/बी) दुप्पट प्रवासी होते. मृतकाच्या शरीरावर मारहाण, जखम किंवा खरसटल्याचे नव्हते. त्यामुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी होती. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतकाजवळ जनरलचे जुने तिकीट मिळाले.