विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न – जिल्हाधिकारी संजय दैने

– 972 मतदान केंद्र : 24 मतदान केंद्र वाढले

– 8 लाख 19 हजार 570 मतदार

– 7 हजार मतदान कर्मचारी तर 17 हजार सुरक्षा कर्मचारी

– 5 हेलिकॉप्टरची मागणी 

गडचिरोली :- लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान गडचिरोलीतून झाले होते याचा उल्लेख भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रकार परिषदेतही केला होता. आता विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रशासनाद्वारे ८० टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक  निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दैने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील देतांना निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २२ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्राची छाननी ३० ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर, मतदान २० नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने काल जाहिर केले असल्याचे सांगितले. तेव्हापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघातील 972 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी सुमारे 8 लाख 19 हजार 570 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 7 हजार कर्मचारी कर्तव्यावर राहणार आहेत.

मतदान केंद्र : मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक मतदार संघात 8 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 24 मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. यात आरमोरी विधानसभा क्षेत्रात 310, गडचिरोली क्षेत्रात 362 तर अहेरी क्षेत्रात 300 असे एकूण 972 मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली

जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या : जिल्ह्यात एकूण 8 लाख 19 हजार 570 मतदार असून यात पुरुष मतदार 4 लाख 11 हजार 384, स्त्री मतदार 4 लाख 8 हजार 132, इतर मतदार 9 यांचा समावेश आहे. आरमेारी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 130820, स्त्री मतदार – 131347, इतर -1, एकूण -262168), गडचिरोली विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार –154284, स्त्री मतदार – 152086, इतर -2, एकूण -306417), अहेरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 126280, स्त्री मतदार – 124699, इतर-6, एकूण -250985) . जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या- पुरूष 9639, स्त्री 7549 व इतर 1 अशी एकूण 17 हजार 189 इतकी आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 6012 इतकी आहे. मतदार नोंदणी प्रक्रीया नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

उमेदवारास खर्चाची मर्यादा : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे.

सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल.

सोशल मीडियावर लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

पोलिस विभागाची माहिती देतांना जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले की विविध दलाचे सुमारे 17 हजार सुरक्षा कर्मचारी निवडणूक शांततने पार पाडण्यासाठी तैनात राहणार आहेत. यादरम्यान 750 कि.मी. रोड ओपनिंग करण्यात येणार असून संवेदनशील क्षेत्रात मतदान कर्मचारी व साहित्य पोहोचविण्यासाठी ५ हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे तसेच छत्तीसगड व तेलंगना राज्यसिमेवर 11 तपासणी नाके कार्यान्वित राहणारअसल्याचे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एका कोर्टाने दिला न्याय तर दुसऱ्या कोर्टाने दिली सजा !

Thu Oct 17 , 2024
– केस क्लोजिंगच्या चक्कर मध्ये निर्दोष व्यक्तीला 19 दिवस कारावास भोगावा लागला व समाजात बदनामी ! नागपूर :- दि. १४/१०/१९८१ में मनीराम काशीराम ठाकरे तोतलाडोर निवासी पर अपराध क्रमांक ११८/१९८१ आई.पी.सी. ३७६ के तहत मामला दर्ज हुआ था, लेकिन कुछ दिनों में ही उसे जमानत मिल गई थी और तब से वह आरोपी मनीराम काशीराम ठाकरे माननीय न्यायालय के समक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com