संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे छिंदवाडा जिल्ह्यातील देवगड येथे एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. . शैक्षणिक सहली दरम्यान, १६ व्या शतकात गोंड शासकांनी बांधलेल्या देवगड किल्ल्याला भेट देण्यात आली. हा किल्ला आपल्या अद्वितीय सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रसिद्ध होता.
या किल्ल्याच्या बांधकामासाठी मुख्यतः दगड आणि चुन्याचा वापर करण्यात आला असून काही ठिकाणी विटा व लाकडाचा देखील प्रयोग करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी किल्ल्यातील मोती टंका, नाकरखाना, हाथीखाना, दरबार, राजाची सभा, खजिना, बादल महाल या भागांना भेट दिली. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांना अनेक प्रश्न विचारले, प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी देवगड़ किल्याचे शासनकर्ता जातबा, कोकशाह, जातबा द्वितीय, कोकशाह द्वितीय, व नागपुरचे संस्थापक बख्तबुलंद शाह आणि त्यांचा पुत्र चाँद सुलतान यांचे संदर्भ देत किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देऊन विद्यार्थ्यांची जिज्ञासा शांत केली.
शैक्षणिक सहलीच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवती, उपप्राचार्य डॉ. रेणु तिवारी, आय. क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे आणि डॉ. आशिष थूल यांनी परिश्रम घेतले. शैक्षणिक सहलीत एकूण ६० विद्यार्थी सहभागी झाले होते.