धनगर समाजासह वंचितांचा विकास करणारच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

मुंबई :-धनगर समजासह राज्यातील सर्व उपेक्षित , वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळया योजना उपेक्षित , वंचित वर्गापर्यंत पोहचवून दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणू , असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. धनगर समाजासाठी राज्य अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनांतर्फे  फडणवीस यांचा भाजपा प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी मंत्री कृपाशंकर सिंग आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजना अभ्यास करूनच तयार करण्यात आल्या आहेत. मेंढपाळांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीच शेळी व मेंढी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व योजनांसाठी जाहीर केलेला निधी उपलब्ध होणार आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याकडे लक्ष न देता या सर्व योजना समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी धनगर समाजाच्या नेत्यांची आहे. पंतप्रधान आवास योजनेतून किमान २५ हजार घरे धनगर समाजातील लोकांसाठी बांधली जातील. आदिवासी पाडे , धनगर वस्त्या , बंजारा तांडे यांच्यासाठी रस्ते बांधण्याची योजना सरकारने आखली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजासाठीच्या योजना गरजू वर्गापर्यंत पोहचविल्या जातील . भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या प्रसारासाठी अखंड मेहनत घेत आहेत. बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या मागे पक्षाची ताकद उभी केली आहे. या माध्यमातून वंचितांसाठीच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविल्या जातील , असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे आयोजक आ. गोपीचंद पडळकर म्हणाले की, रानोमाळ भटकणाऱ्या पण विकासापासून वंचित राहिलेल्या मेंढपाळ समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जशा योजना आणल्या आहेत तशा आजवर कधीच आणल्या गेल्या नव्हत्या. म्हणून समाजातर्फे आम्ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. गावगाड्यातील सर्व उपेक्षित , वंचित घटकांबद्दल फडणवीस हे संवेदनशील असल्यानेच त्यांनी या योजना तयार केल्या आहेत. यावेळी धनगर समाजाच्या परंपरेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचा घोंगडी , फेटा आणि कुऱ्हाड देऊन सत्कार करण्यात आला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com