नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज मेट्रो भवनला शैक्षणिक भेट दिली. स्नातक आणि स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या सुमारे २५ विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत आजचा हा दौरा केला. यावेळी महा मेट्रो नागपूरच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना इंथंभूत माहिती दिली.
मेट्रो भवनमधील अनुभूती केंद्र, प्रदर्शनी, ग्रंथालय, गुंज ऑडिटोरिअम, कंट्रोल सेंटर, परिचालन नियंत्रण कक्ष (ओसीसी), गॅलरी, कॉन्फरन्स हॉल या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. नागपूर मेट्रोचे संचालन कश्या प्रकारे केले जाते, कश्या प्रकारे मेट्रो रेल प्रकल्प शहरात तयार झाला, बांधकामाच्या वेळेला आलेले आव्हानं, प्रकल्प निर्मितीच्या वेळी नेमक्या कुठल्या अडचणींना मेट्रोला सामोरे जावे लागले, मेट्रोच्या ब्रॅण्डिंगसाठी वापरावयाचे तंत्र, लोकांशी संवाद साधण्याची साधने, भविष्यातील प्लॅन अश्या विविध विषयांशी संबंधीत माहिती या भावी पत्रकारांनी जाणून घेतली.
प्रकल्पासंबंधी विविध बाबी जसे नॉन-फेयर बॉक्स रेव्हेन्यू, मेट्रो स्टेशन आणि त्यांचे डिझाईन, गड्डीगोदाम येथील बहू-स्तरीय वाहतूक प्रणाली अश्या इतर बाबींसंबंधी माहिती विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सुकतेने जाणून घेतली.
उल्लेखनीय आहे कि या विध्यार्थ्यामध्ये भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता जे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे.
विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अनुभवांच्या आणि माहितीच्या आधारे विद्यार्थी त्यांचा शैक्षणिक प्रकल्प तयार करणार असून, मेट्रो भवन पाहून अत्यंत आनंद झाल्याचे आणि माहिती मिळाल्याने अभ्यासासाठी ते उपयोगी पडणार असल्याने विद्यार्थ्यांनी महा मेट्रो नागपूरचे आभार मानले.