योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा आर्थिकस्तर उंचावणार – मंत्री अब्दुल सत्तार

 अल्पसंख्याक लाभार्थ्यांसाठी कार्यशाळा व कर्ज योजनेचा शुभारंभ

 शुभारंभावेळी सादर केलेल्या अर्जांवर तातडीने कारवाईचे निर्देश

नागपूर :- अल्पसंख्याक प्रवर्गातील नागरिकांचे अजूनही अनेक प्रश्न आहे. त्यातील मुसलमान समाजाची परिस्थिती बेताची आहे. या प्रवर्गाला इतर प्रवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. विभागाची आर्थिक तरतूद देखील वाढविण्यात आली आहे. या माध्यमातून या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचावणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

डॅा.वसंतराव देशपांडे सभागृहात अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळा व कर्ज योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ.डॅा.वजाहत मिर्झा, हज समितीचे अध्यक्ष आसिफ खान, आ.अबू आझमी, आ.रईस शेख, माजी मंत्री अनिस अहमद, विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, उपसचिव तथा वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा.तासिलदरा, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लालमिया शेख तसेच मुदस्सर पटेल, प्यारे खान आदी उपस्थित होते.

अल्पसंख्याक प्रवर्गातील लाभार्थी व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना विभागातर्फे राबविण्यात येतात. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची हमी रक्कम 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसाय, उद्योग, शिक्षण यासाठी कर्ज मागणाऱ्या प्रत्येकाला कर्ज उपलब्ध होणार आहे. शैक्षणिक कर्जासाठी शासकीय अधिकारी हमीदार असावा, अशी अट आहे. ही अट काढून टाकू. यामुळे कर्ज मिळणे अधिक सोपे होईल, असे सत्तार म्हणाले.

महामंडळाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाचे प्रमाण 3 लाखावरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. परदेशात नामांकित विद्यापिठात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना भविष्यात 40 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी गटाच्या महिलांना 2 लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम 25 हजारावरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वाटप केली जावी, असे त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक आयुक्तालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर विभागाची स्वतंत्र ईमारत व याठिकाणी विभागाचे सर्वच कार्यालय एकाच ईमारतीत राहतील, असे देखील नियोजन आहे. जिल्हास्तरावर अल्पसंखाक विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाच्या धर्तीवर स्वतंत्र व सुसज्ज वसतीगृह तयार केले जाणार आहे. कर्ज योजनेच्या शुभारंभाप्रसंगी प्राप्त कर्जांचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॅा.मिर्झा यांनी बोर्डाच्या कामाची माहिती दिली. बोर्डाची रिक्त 170 पदे भरण्यास मान्यता मिळाल्याने येत्या तीन महिन्यात ती पदे भरली जातील असे सांगितले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी हजला जाणाऱ्या मुस्लीम बांधवांसाठी विमान प्रवासाचे दर देशात सर्वत्र सारखे असावे, असे सांगितले. आ.अबू आझमी, आ.रईस शेख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांनी केले. विभागाची कामे व योजनांची माहिती त्यांनी दिली.

कार्यशाळा व कर्ज योजनेच्या शुभारंभानिमित्त सभागृहाच्या आवारात प्रदर्शनी लावण्यात आली होती. स्टॅालवर लाभार्थी व विद्यार्थ्यांना विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच अर्ज भरून घेण्यात आले. कार्यक्रमास अल्पसंख्याक प्रवर्गातील मुस्लीम, बौद्ध, शिख, पारसी, ख्रिश्चन, जैन समाजातील नागरिकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस

Mon Dec 18 , 2023
*राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत* *शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन* *‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा* नागपूर :- दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!