पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करा : महापौर

– “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरण प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आणखी दोन दिवस राहणार प्रदर्शन  
– महापौर आणि उपमहापौरांनी केली इलेक्ट्रिक बाईकची टेस्ट राईड; आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी दिली भेट 
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने माझी वसुंधरा अभियान २.० व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी आयोजित “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरण प्रदर्शनाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे हे प्रदर्शन आणखी दोन दिवस म्हणजेच १७ व १८ डिसेंबर रोजी देखील सुरु राहणार आहे. दरम्यान, महापौर राखी संजय कंचर्लावार आणि उपमहापौर राहुल पावडे यांनी इलेक्ट्रिक बाईकची टेस्ट राईड घेतली. यावेळी महापौरांनी पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
वाहतुकीतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पेट्रोल-डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी सोयीचे व्हावे, यासाठी गांधी चौक स्थित चंद्रपूर शहर महानगरपालिका मुख्यालय शेजारील पार्किंगमध्ये माझी वसुंधरा अभियान २.० व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरणांचे प्रदर्शन” भरविण्यात आले. त्याला चंद्रपुरातील नागरिकांनी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी प्रदर्शनात ठेवलेल्या इलेक्ट्रिक बाईकची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. महापौर व उपमहापौरांनी इलेक्ट्रिक बाईक राईड केली. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे यांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली.
इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जनामुळे पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर आहेत. कमी दुरुस्ती खर्च, चालवण्यास सुलभ, घरी चार्जिंग करणे सोयीचे, कमी खर्चात चार्जिंग, ध्वनी प्रदूषणविरहित आहे. सौरऊर्जा हा ऊर्जेचा नैसर्गिक आणि प्रदूषणरहित स्रोत समजला जातो. त्यामुळे चंद्रपूर मनपा सौर ऊर्जेच्या वापरावर भर देत आहे.
प्रदर्शनात ठेवलेल्या सौर उपकरणांच्या स्पॉट बुकिंगवर ‘आकर्षक सूट’ देण्यात येत आहे. तसेच १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करून महानगरपालिकेअंतर्गत http://surl.li/ayprp या लिंकवर नोंदणी करणाऱ्या १० भाग्यवान विजेत्यांना ‘लकी ड्रॉ’ द्वारे ‘हेल्मेट’ बक्षिस देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात एसआर मोटर्स, एसएसइव्ही मोटर्स, यो बाईक्स- प्रगती इंटरप्रायझेस, ग्रीन लाईफ सोल्युशन्स प्रा. लिमी., इस्पी मोटर्स यांनी सहभाग घेतला होता.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पथनाट्याद्वारे मतदार जागृती कार्यक्रम

Fri Dec 17 , 2021
भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध शाळा महाविद्यालय मार्फत कार्यक्रमाद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे. नुकतेच नूतन कन्या महाविद्यालय भंडारा येथील बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयाद्वारे पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या पथनाट्यमध्ये मतदान, मतदानाचा हक्क, मतदारांची कर्तव्य याबाबत नाटकीय सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण अकरा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!