नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत नागपूर महानगरपालिकेद्वारे मातीपासून बनलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तींबाबत जागरूकता केली जात आहे. यात आता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतुन आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
सोमवारी २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता रेशीमबाग येथील मनपाच्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मातीपासून श्रीगणेशाच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडणार आहे. या कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, कला शिक्षक, मनपाचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर, अधिकारी हे सर्व सहभागी होतील. मूर्तीकार दिपक भगत आणि नाना भगत हे मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती निर्माण करण्याचे उपस्थितांना धडे देतील. कार्यशाळेमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला मनपाद्वारे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या जयताळा मराठी माध्यम, शाळा, शिवणगाव मराठी माध्यम शाळा, विवेकानंद हिंदी माध्यम शाळा, एकात्मता नगर मराठी उच्च प्राथमिक शाळा, दुर्गानगर मराठी माध्यम शाळा, दत्तात्रय नगर मराठी माध्यम शाळा, ताजबाग उर्दू माध्यम शाळा, डॉ. आंबेडकर मराठी माध्यम शाळा, लालबहादुर शास्त्री हिंदी माध्यम शाळा, वाल्मिकी नगर हिंदी माध्यम शाळा, पेंशननगर उर्दू माध्यम शाळा, नेताजी मार्केट हिंदी माध्यम शाळा, डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा, पन्नालाल देवडीया हिंदी माध्यम शाळा, संजयनगर हिंदी माध्यम शाळा, कपिल नगर हिंदी माध्यम शाळा, एम.ए.के. आझाद उर्दू माध्यम शाळा, जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यम शाळा, हाजी अ.म. लीडर उर्दू माध्यम शाळा, कुंदनलाल गुप्ता माध्यम शाळा आणि गरीब नवाज उर्दू माध्यम शाळा या शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हे एक महत्वाचे पाउल आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवात आपले योगदान देउन चिमुकल्यांना लाडक्या बाप्पाच्या मूर्ती बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी पालकांनी मुलांना कार्यशाळेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.