नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यद्वारे शुक्रवार २८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये ई-वेस्ट संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या संदर्भात नुकतेच रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरद टावरी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यद्वारे पर्यावरण, आरोग्य आणि इतर उपक्रमांमध्ये यापूर्वीही मनपाला सहकार्य लाभलेले आहे. संस्थेचे सुमारे ३०० स्वयंसेवक शहरात कार्यरत असून त्यांच्याद्वारे सर्व उपक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली जाते. मनपाच्या सहकार्याने घेण्यात येणा-या ई-वेस्ट संकलन मोहिमेमध्ये देखील स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ई-कचरा संकलनाचे कार्य करणार आहेत. रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यद्वारे नागपूर शहराला सात भागांमध्ये विभागण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये दर दिवशी एकेका भागामध्ये जाउन ई-वेस्ट संकलीत केले जाणार आहे. या कार्यामध्ये संस्थाला सुरिटेक्स प्रा. लि. या कंपनीची देखील मदत घेणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या उपक्रम दरम्यान शहरातील इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापन व समस्येचे निराकरण करण्याचे ध्येय आहे. संकलित ई-कचऱ्याची जबाबदारीने विल्हेवाट लावण्यासाठी Suritex Pvt.Ltd. सह भागीदारी केली आहे. या उपक्रमातून संकलित झालेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत म्हणून दिला जाईल. या समाजकल्याण्याच्या उपक्रमाकरिता नागपूर महानगरपालिकेने अमूल्य सहकार्य करावे, असे निवेदन नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यद्वारे देण्यात आले आहे.