बंदीजनांच्या कुटुंबियांशी संवादासाठी ई-मुलाखत सुविधा;राज्यात 3 लाख 16 हजार 647 ई-मुलाखती

मुंबई :- बंदीजनांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकिलांशी संवाद साधण्यासाठी ई- प्रिझन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत ई- मुलाखत सुविधा 04 जुलै 2023 पासुन कार्यान्व‍ित झाली आहे. ही सुविधा सर्व कारागृहांत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत 01 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये बंद्यांच्या संवादासाठी राज्यात 3 लाख 16 हजार 647 ई-मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

या कालावधीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह 45 हजार 174, तळोजा मध्यवर्ती कारागृहात 43 हजार 848, ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे 36 हजार 371, मुंबई मध्यवर्ती कारागृहात 29 हजार 347, नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे 31 हजार 444, कल्याण जिल्हा कारागृहात 22 हजार 608, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे 23 हजार 860 इतक्या ई-मुलाखती झालेल्या आहेत. राज्यातील उर्वरित कारागृहांमधील ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या बंदीजनांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

पूर्वी मुलाखत नाव नोंदणीसाठी नातेवाईकांना खूप दूरवरुन प्रवास करुन कारागृहाबाहेर तासन्-तास वाट पहावे लागायचे. त्यामुळे बंद्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. परंतु आता बंदीजनांसोबत मुलाखत घेण्याकरिता नातेवाईक काही दिवस आधीच ई प्रिझन (ePrisons) प्रणालीद्वारे नोंदणी करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित दिवशी व वेळी संवाद साधता येतो.

राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध देशातील नागरिक विदेशी बंदी म्हणुन दाखल आहेत. त्यांची परदेशातील मुले, मुली व नातेवाईकांशी ई-मुलाखत अथवा व्हीडीओ कॉन्फरसद्वारे विहीत अटीवर सुविधा लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये 1105 पेक्षा अधिक विदेशी बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून त्यांचा आपले कुटुंबिय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. परंतु ही सुविधा सुरु झाल्यामुळे विदेशी बंद्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद होत आहे. त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत. अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबियांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधतांना विदेशी बंद्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत आहे.

बंदीजनांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे यांचे 22 मार्च 2024 रोजीचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार न्यायाधीन बंद्यांना महिन्यातून चार वेळा व शिक्षाधीन बंद्यांना दोन वेळा नातेवाईक, मित्र व वकीलांसोबत नियमांचे अधीन राहुन ई मुलाखत सुविधा देण्यात येत आहे. बंद्यांना ही सुविधा देण्यासंबंधीच्या या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

बंदीजनांना ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे जास्तीत जास्त बंद्यांच्या नातेवाईकांचा या सुविधेकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे बंद्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्यक्ष संवादासाठी येण्याच्या खर्चातदेखील बचत झालेली आहे. या सुविधेच्या अंमलबजावणीबाबत पुणे येथील कारागृह व सुधारसेवेचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर यांचेकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे.

ही सुविधा लागू झाल्याची माहिती बंद्यांच्या नातेवाईकांना मिळण्याकरिता सर्व कारागृहांच्या दर्शनी भागांमध्ये नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच नातेवाईक भेटीच्या ठिकाणी बंद्यांच्या नातेवाईक अथवा वकील यांना एनपीआयपी पोर्टलवर मुलाखत नोंदणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक एलईडी स्क्रीनवर व्हिडीओ क्लीपद्वारे दाखवण्यात येत आहे. ई-मुलाखतीस बंद्यांच्या नातेवाईकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृह विभागाची आधुनिकतेकडे वाटचाल होत असल्याचे कारागृह प्रशासनाने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

१० वी व १२वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज 'आपले सरकार' प्रणालीद्वारे १० मार्च पर्यंत स्वीकारले जाणार

Fri Feb 14 , 2025
मुंबई :- दरवर्षीप्रमाणे इयत्ता १० व १२ खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफ लाइन अर्ज मागविले जातात. माहितीचे संकलन कार्यालयाद्‌वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळात पाठवले जातात. सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारा ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांनी या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!