ज्ञानेश्वर मुळे यांचे पुस्तक युवक-युवतींना परराष्ट्र सेवेत रुजू होण्यासाठी प्रोत्साहित करेल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :-डॉ ज्ञानेश्वर मुळे हे परराष्ट्र सेवेतील यशस्वी अधिकारी असून त्यांनी विविध देशांमध्ये भारताचे मुत्सद्दी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. आपल्या संपूर्ण करिअर मध्ये त्यांनी जनसामान्यांशी आपले नाते जोपासले व विविध विषयांवर लेख लिहून वाचकांचे प्रबोधन केले. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे अनुभवांवर आधारित पुस्तक सर्वसामान्य वाचकांना आवडेल तसेच युवक युवतींना परराष्ट्र सेवेत रुजू होण्यासाठी प्रोत्साहित करेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या ‘मैं जहाँ जहाँ चला हूं’ व ‘माणूस आणि मुक्काम’ या सेवाकाळातील अनुभवांवर आधारित दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. ७) राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

प्रकाशन सोहळ्याला मुळे यांच्या पत्नी व मुख्य आयकर आयुक्त साधना शंकर, अभिनेते जॅकी श्रॉफ, अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी व रमेश गोवाणी, अनुवादक शशी निघोजकर, प्रकाशक दिलीप चव्हाण, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

डॉ.ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी जपान, मॉरिशस, सीरिया, अमेरिका, मालदीव या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पासपोर्ट कार्यालये उघडण्याच्या कार्यात महत्वाचे योगदान दिल्यामुळे त्यांना ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. डॉ मुळे यांचे पुस्तक अनुभवांवर आधारित असून पुस्तकातून त्यांच्यातील संवेदनशील मनुष्याचे दर्शन घडते असे राज्यपालांनी सांगितले.

मुत्सद्दी व्यक्तीचे जीवन आव्हानात्मक असते. देशसेवेसाठी त्यांना दर तीन-चार वर्षांनी अन्य देशात जावे लागते. यातून त्यांचे जीवन अनुभवसंपन्न होते. त्यातून त्यांची विविध संस्कृती, परंपरा, भाषा व दृष्टिकोनांची समज वाढते, तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक समस्यांची उत्तम जाण होते. ही अंतर्दृष्टी पुढे देशासाठी प्रभावी वाटाघाटी करण्याच्या, तसेच धोरणे तयार करण्याच्या कामात उपयोगी ठरते असे राज्यपालांनी सांगितले.

जीवन प्रवास डिझनेलँड प्रमाणे

कोल्हापूर जिल्ह्यात एका लहान गावात जन्म घेऊन आपण स्वप्नातील प्रवासाप्रमाणे कोल्हापूर, मुंबई व दिल्ली आणि त्यानंतर परराष्ट्र सेवेमुळे विविध देशांमध्ये गेलो. भौतिक, मानसिक व अध्यात्मिक स्तरावरील आपला जीवनप्रवास डिझनीलँड प्रमाणे रोमांचक होता. त्यामध्ये रोलर कोस्टर सारखे कधी आनंदाचे प्रसंग तर कधी उत्कंठावर्धक क्षण होते, असे लेखक डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

यावेळी त्यांनी आपल्या दोन्ही पुस्तकांमधील जपान, पाकिस्तान, मॉरिशस व राजधानी दिल्ली संबंधित प्रकरणांमधील उतारे वाचून दाखवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भाची भाग्यरेषा कॉफी टेबल बुकचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Sun Oct 8 , 2023
भंडारा :- जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने प्रकाशित विदर्भाची भाग्यरेषा या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साकोली येथील खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार सुनिल मेंढे,माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले यांच्यासहित अन्य मान्यवर व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. गोसे खुर्द प्रकल्पाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या या पुस्तिकेमध्ये गोसे खुर्द प्रकल्पाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!