डम्पिंग यार्ड : पुन्हा पुन्हा तेच तेच

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी गुमथळा मार्गावरील आजनी मोक्षधाम जवळून वाहणारा आणि पुढे कन्हान नदीला जाऊन मिळणाऱ्या धोबी नाला परिसरात काही वर्षांपूर्वी कामठी नगर परिषदेने या मार्गावरून रहदारी असलेल्या कुठल्याही गावाला विश्वासात न घेता कामठी शहरातून संकलित केलेला कचरा टाकण्यासाठी डम्पिंग यार्ड बनविले. त्यानंतर अजूनपर्यंत कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया न करता कचरा तसाच साठविला जातो आहे. कचरा वाळला की त्याला कुणाच्यातरी माध्यमातून आग लावण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आग लावल्यावर होणाऱ्या धुरामुळे आजनी, रामगड, छावणी परिसरातील त्रस्त झालेल्या अनेक नागरिकांनी याविरोधात आवाज उठवला होता. या कचऱ्यावर प्रक्रिया करावी किंवा डम्पिंग यार्ड अन्यत्र हलविण्यात यावे यासाठी आजनी, गादा, नेरी, आवंढी, भोवरी अशा या रस्त्यावरून रहदारी असलेल्या गावातील ग्राम पंचायत तसेच कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकारी, तहसील, नगर परिषद आदींना निवेदन दिले होते. बहुदा आता त्यास कचऱ्याच्या टोपलीत टाकले असावे.

कित्येकदा या डम्पिंग ग्राऊंडवर मृत जनावरे आणून टाकली जातात.त्याच्या दुर्गंधीने आणि त्यावर तुटून पडणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह ये जा करणारे नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहेत. एवढेच नाही तर याठिकाणी अनेकदा जैविक कचरा, ई वेस्ट सुद्धा टाकण्यात आल्याची तक्रार कित्येकदा नागरिकांनी नोंदवली होती. या कामी आजनी येथील अनेक कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

नुकत्याच आलेल्या जोरदार पावसात या डम्पिंग मधील कचऱ्याने धोबी नाला पूर्णतः बुजला असल्याने पाणी रस्त्यावर दोन ते तीन फुटांपर्यंत साचले होते. परिणामी या रस्त्यावरून वाहणारी रहदारी संपूर्णतः खोळंबली होती.

आता पुन्हा डम्पिंग भरले असल्याने कचरा गाड्या पुढे जाऊ शकत नसल्याचे कारण पुढे करत संकलित केलेला कचरा, मृत जनावरे अगदी रहदारीच्या रस्त्यापर्यंत आणून टाकल्याने या मार्गावरून जाणारे येणारे चाकरमानी, विद्यार्थी तसेच रुग्णालयात जाणारे रुग्ण सुद्धा त्रासले आहेत. या डम्पिंग विरोधात अनेकदा स्थानिक पत्रकारांनी बहुतांश सर्वच वृत्तपत्रांत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. पण, झोपेचे सोंग घेवून झोपलेल्या प्राशासनाला ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नाही, असे म्हणावे लागते. कीतीही तक्रारी करा किंवा विरोध करा, आम्ही असेच वागू हा नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आडमुठे पणा ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा असून ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते विरोध करतातच आणि नगर परिषद कर्मचारी कचरा रस्त्यांवर आणून टाकतातच. म्हणजे एकंदर पुन्हा पुन्हा तेच तेच सारखे हे प्रकरण मात्र ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील क्रोधाला खतपाणी घालणारे ठरेल, एवढे मात्र नक्की..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - ना.सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना दिला विश्वास

Tue Aug 6 , 2024
– ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर – पिक विम्या संदर्भात मुंबई येथे कृषीमंत्री यांच्या समवेत 7 ऑगस्टला तातडीची बैठक चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजने संदर्भात शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत. अर्थसंकल्पात राज्य शासनाने पिक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. या संदर्भात तातडीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com