– जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी
मुंबई :- ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन योजनेतील कामे गतीने व्हावीत. केंद्र शासनामार्फत या योजनेतील कामांचा नियमित आढावा घेतला जात असल्याने योजनेची कामे कालमर्यादेत व गुणवत्ता पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालय येथे नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील विविध कामांसंदर्भात बैठक झाली.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, संचालक ई रवींद्रन, सहसचिव बी.जी पवार, मुख्य अभियंता तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे, दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना क्षेत्रीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देणे आवश्यक आहे. या कामांमध्ये येणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योजनेच्या कामांना गती द्यावी.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करुन आदिवासी पाड्यातपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा. जल जीवन मिशन योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी यंत्रणांनी त्यांच्याकडील विषय, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांनी दिल्या.
बैठकीत जल जीवन योजनेतील कामांच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या चिंचवड व सहा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, वाघेरा व 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, चिखलपाडा व आठ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि घोटी बुद्रुक पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. याबरोबरच हर घर जल योजनेचाही आढावा घेण्यात आला.