संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोणी सायकलवरुन तर कोणी पायदळ चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून आज कामठी वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा वृत्तपत्र विक्रेत्याच्या कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यालाही समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक, कवी, साहित्यिक लिलाधर दवंडे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की कामठी शहरात जवळपास 35 वृत्तपत्र विक्रेते आहेत. . इमानेइतबारे व्यवसाय करणारा ह घटक तसा उपेक्षित राहिला आहे. कामठी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. काही जणांची एक पिढी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात आहेत. वडील, मुलगा असे पिढ्या व्यवसायात आहेत.वृत्तपत्र विक्री व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे देहावसान झालेले नामदेव बेहार यांनी जवळपास 50 वर्षे वृत्तपत्र विक्री व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला .अखेर वयोवृद्ध स्थितीत देहावसान झाल्याने आता मुलगा देवेंद्र बेहार या व्यवसायात निपुन आहेत तर 65 वर्षीय रामू सांगोळे हे मागील 25 वर्षांपासून सायकलने वृत्तपत्र विक्री करीत असून दररोज पहाटे उठून कामठी ते वारेगाव,बिना, भानेगाव पर्यंत वृत्तपत्र वितरित करतात ,60 वर्षीय ताराचंद शाहू मागील 25 वर्षे तर 76 वर्षीय सुरेश अढाऊ हे मागील 40 वर्षेपेक्षा जास्त कालावधी पासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत ,वृत्तपत्र क्षेत्रातील हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. तरीसुध्दा वृत्तपत्र विक्रेता हा घटक उपेक्षित आहे तेव्हा वृत्तपत्र
विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी,पेन्शन योजना लागू करावी,वृत्तपत्र विक्रेता झोन भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,
सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांचा अपघात विमा उतरविला पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन सुदधा अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
याप्रसंगी कामठी वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष दिपंकर गणवीर यांनी सांगितले की वृत्तपत्र विक्रेता हा घटक दुर्लक्षित आहे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. काहीजण वृत्तपत्र विक्रेत्यांचा ‘एकेरी’उल्लेख करतात. तर काहीजण आदरही करतात. प्रामाणिकपणाने काम करणारा हा वर्ग आहे. या घटकाकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी.
वृत्तपत्र विक्रेता ते देशाचे राष्ट्रपती हा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस हा ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा होतो. हा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सन्मानाचा दिवस आहे. त्यांनाही समाजात सन्मान लाभावा अशी अपेक्षा सुदधा व्यक्त केली.
कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष लीलाधर दवंडे , ज्येष्ठ पत्रकार सुरेश अढाऊ यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.याप्रसंगी कामठी वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष दिपंकर गणवीर,प्रफुल लुटे, किशोर खेडकर,निलेश ढोके, हुसेन अली,निखिलेश डोंगरे,विलास बांगरे, सागर बिसने,ताराचंद शाहू,प्रीतम जोशी,सुरेश अढाऊ,यमन शाहू,राहुल शेलारे, आर्यन गजभिये,शुभम ठाकूर,विशाल मते,सम्येक बन्सोड,राजेश काटरपवार,अरुण कातोरे, अमन उके आदी उपस्थित होते.