डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई :- मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले.

वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमास व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेलवन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील त्यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राज्य शासन इंदू मिल येथे त्यांचे भव्य स्मारक साकारत आहे. त्यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. संविधानाच्या तत्त्वावर देशाचा कारभार सुरू आहे. या संविधानानेच देशाच्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे. बाबासाहेबांचा पुतळा हा संविधानशिवाय अपूर्ण असतो. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून शोषित, पीडित लोकांना न्याय देण्याचे काम केले. संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली. संविधान निर्माण करताना त्यांची दूरदृष्टी आणि बुद्धीची प्रगल्भता लक्षात येते.

डॉ. बाबासाहेबांचा मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर पहिला सत्कार मुंबईत झाला. एवढेच नव्हे तर, केंद्रीय मंत्री, प्रांतिक अध्यक्ष, गोलमेज परिषदेवरून देशात परत आल्यावर, राज्यघटना पूर्ण करून परत आल्यानंतर अशा अविस्मरणीय क्षणी बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार मुंबईमध्येच झाला. बाबासाहेब यांनी वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चैत्यभूमीवर अभिवादन सभाही मुंबईतच पार पडल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनपटात त्यांना उजाळा देणारे, त्यांच्या स्मृती जागविणारे अनेक प्रसंग मुंबईने अनुभवले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि प्रिंटिंगही मुंबईतच झाले. त्यांच्या राजकीय आयुष्याचे अनुष्ठान हे मुंबईतूनच सुरू झाले. शोषितांचा आवाज बनवून ते आयुष्यभर लढले, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

प्रास्ताविक आमदार कोळंबकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Tue Apr 15 , 2025
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे चैत्यभूमी येथे अभिवादन मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!