नागपूर : इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे हे स्मारक अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंचीच्या पुतळ्याचे १८ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बेसमेंट वाढवायचे असल्याने काम थांबले होते. पण आता सविस्तर बैठक घेण्यात आली असल्याने स्मारकाचे काम लवकर पूर्ण केले जाईल.
या स्मारकाबाबत मुख्यमंत्री आढावा घेत असल्याने निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. या स्मारकाकरिता २६६ कोटी खर्च झाले असून समाजकल्याण विभागाने यासाठी ३६६ कोटी रुपये म्हणजे १०० कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. या स्मारकासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू झाली असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी उत्तरात सांगितले.