नागपूर :-“तुमचा कॅमेरा किती महाग आहे, यापेक्षा चित्रपट निर्मितीमध्ये कथा सांगण्याची कला अधिक महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट आणि माहितीपट निर्माते आदित्य शर्मा यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या सहकार्याने विद्यापीठाच्या सुरू असलेल्या शताब्दी महोत्सवादरम्यान ही ‘सिनेस्टोरी’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘सिनेस्टोरी’ या विद्यापीठस्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
‘सिनेस्टोरी’ ही लघुपट निर्मिती स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत सर्व महाविद्यालये, संस्था आणि अध्यापन विभागांसाठी खुली होती. ‘दृष्टिभ्रम’ या वेब सिरीजचे दिग्दर्शन केलेले आणि अनेक पुरस्कार विजेते चित्रपट बनवणारे आदित्य शर्मा यांनी दृकश्राव्य निर्मितीच्या क्रिएटिव्ह तसेच तांत्रिक बाबींमधील त्यांचे अनुभव आणि ज्ञान कथन केले. त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग, चित्रीकरण आणि व्हिडीओचे एडिटिंग याबाबत मौल्यवान टिप्स उपस्थितांना दिल्या. दूरदर्शनच्या ३४ वर्षांच्या अनुभवानंतर निवृत्त झालेले अनुभवी चित्रपट आणि माहितीपट निर्माते राजीव गायकवाड हे पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष होते. ते स्पर्धेच्या ज्युरीचे अध्यक्षही होते.
प्रो-कॅमेरा गटात प्रथम पारितोषिक डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमीच्या संघाने पटकावले, तर मोबाईल फोन प्रकारात प्रथम पारितोषिक जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूरला मिळाले. दोन श्रेणीतील द्वितीय पारितोषिक अनुक्रमे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, नागपूरच्या संघांनी पटकावले. संयुक्त तृतीय पारितोषिक विजेते डॉ. आंबेडकर ज्यु. कॉलेज, नागपूर आणि जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, नागपूर हे ठरले. या स्पर्धेकरिता ट्रॉफी प्रायोजक पारसा म्युझिक प्रोडक्शनचे प्रतिनिधित्व मिस पूनम बसू यांनी केले. या संघांना रोख रक्कमेची पारितोषिकेही देण्यात आली. ३०००/-, रु. २०००/- आणि रु. १०००/- प्रत्येक श्रेणीतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पुरस्कार देण्यात आले.
तत्पूर्वी, जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईझ मन्नान हक यांनी स्पर्धेचा उद्देश विविध विषयांतील विद्यार्थ्यांना त्यांचे संवाद कौशल्य दृकश्राव्य माध्यमातून दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा असल्याचे स्पष्ट केले. ज्युरीच्या सदस्यांमध्ये राजीव गायकवाड, श्रुती इंगोले,नीरज नखाते, तेजिंदर सिंग मानकू आणि अभिजीत साहू यांचा समावेश होता. पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचालन लिट्टी टॉमसन, निशांत जिभे आणि रुपाली मोहरकर यांनी केले. रुपल अनासाने (दोडके) यांनी आभार मानले. प्रतिक साबळे याने स्पर्धेचे डिझाइन केले होते.