जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! – नांदेड,परभणी येथील जाहीर सभांत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

नांदेड :- गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला प्रेम दिले, माझ्यावर विश्वास टाकला,आणि मला भरभरून आशीर्वाद ही दिले, पुढील काळात देशाचा वेगवान विकास करून मी याची परतफेड करेन, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली.

‘महायुती’ चे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर (रासप) यांच्या प्रचार सभांमधून मराठवाड्यातील मतदारांशी संवाद साधताना मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानातून ‘एनडीए’ च्या विजयाची खात्री अधोरेखित झाल्याचा विश्वासही व्यक्त केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वत्र ‘एनडीए’ ला एकतर्फी मतदान झाले असून निवडणुकीआधीच पराभूत मानसिकतेत असलेल्या इंडी आघाडीकडे निवडणूक लढण्याची उमेद नाहीच आणि अनेक मतदारसंघांत उमेदवारही नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

नांदेड येथील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे आदी उपस्थित होते. परभणी येथील सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आदी उपस्थित होते.

आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीतील नेत्यांचा परस्परांवर विश्वास नाही आणि देशातील जनतेवरही विश्वास नाही. देशातील 25 टक्के मतदारसंघांत या आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ज्यांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यांच्यावर देशातील जनतेने विश्वास का ठेवावा, असा सवाल करून, एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या आघाडीला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच मतदारांनी नाकारले आहे, असे श्री.मोदी म्हणाले. 4 जूनला निवडणुकीच्या निकालानंतर या आघाडीचे नेते एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील असे भाकितही त्यांनी वर्तविले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही मोदी यांनी परखड टीका केली. अमेठीमधून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी वायनाडमध्ये आले, पण तेथेही त्यांना पराभव चाखावा लागणार असून वायनाडमधील मतदान पार पडल्यानंतर पळ काढून दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे, असे ते म्हणाले. ज्या परिवाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतो, त्या परिवाराचा स्वतःवरच भरवसा राहिलेला नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसचा गरीबांवर विश्वास नाही, त्यांनी विदर्भ मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटला, त्यांच्यामुळे शेतकरी, गरीब दुबळा झाला, उद्योग विकासाला खीळ बसली, लाखो तरुणांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात लाखो घरांना नळाचे पाणी मिळू लागले आहे. पीक विम्याची हमी शेतकऱ्यांना मिळाली आहे,किसान सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे ओझे हलके झाले,भरड धान्याला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिल्याने मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मोठे लाभ मिळणार आहेत, असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या प्रत्येक जखमेवर आम्ही इलाज आणि उपचार करू, ही मोदींची गॅरंटी आहे अशी ग्वाही देऊन ,त्यांनी मराठवाडा विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या कामांची यादीच जनतेसमोर सादर केली. गेल्या पाच वर्षांतील विकास कामे ही तर केवळ सुरुवात आहे, पुढच्या पाच वर्षांत विकासाची कामे अधिक गतिमान होतील, असेही मोदी यांनी सांगितले. 370 च्या जाचातून काश्मीरची मुक्तता, तिहेरी तलाक प्रथेतून मुस्लिम महिलांची मुक्तता, देशातील कोट्यवधी महिलांचे लखपती दीदीसारख्या योजनांतून सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी ही आमची कामगिरी आहे. म्हणूनच गेल्या दहा वर्षांत सुरू झालेल्या विकास यात्रेला बळ देण्यासाठी ‘एनडीए’ च्या उमेदवारांना विजयी करा. कारण हे उमेदवार निवडून आल्यानंतर मोदींना ताकद देणार असून विकासाला बळ देतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. 2024 ची निवडणूक केवळ सरकार बनविण्यासाठी होणारी निवडणूक नाही, तर भारताला समृद्ध आणि विकसित बनविणे हे या निवडणुकीचे लक्ष्य आहे. देशासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत करणार असून कोणीही कितीही अडथळे आणले तरी आता माघार नाही, देशातील जनतेच्या डोळ्यातील स्वप्नांची पूर्तता करणे हाच आमचा संकल्प आहे, असा निर्धार ही मोदी यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महायुतीच्या राजश्री पाटील यांची महीला वर्गात 'क्रेज', बचत गटांच्या ५० हजार महीलांचा राजश्री पाटील यांच्यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रचार

Sat Apr 20 , 2024
यवतमाळ :- महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांची महीला वर्गात प्रचंड क्रेज पाहावयास मिळत आहे. जागोजागी महीलांसह नागरीकांची ताईंसोबत सेल्फी काढण्याची लगबग राजश्री पाटील यांची वाढती लोकप्रियता दर्शविनारी आहे. राजश्री पाटील यांनी सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ताईंनी बचत गटाच्या ५० हजार महीलांना पतपुरवठा करीत स्वयंभु बनविले आहे. ह्या महीला महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांसाठी आपल्या निकटवर्तीयांना संपर्क साधुन प्रचार करीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!