नागपूर :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. या दोन्ही परीक्षांच्या तारखांबाबत विविध माध्यमे तसेच समाज माध्यमांवर अफवा प्रसारीत झाल्यास त्यास बळी पडू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) ची लेखी परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 20 ते 23 मार्च 2024 तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) ची लेखी परीक्षा दिनांक 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या तारखांबाबत विविध माध्यमांद्वारे तसेच सोशल मिडीयावर अफवा प्रसारित केल्या जाण्याची शक्यता असून यामुळे संभ्रमावस्था निर्माण होऊन विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होऊ शकते. या अफवांना बळी पडू नये व अफवा पसरविणाऱ्या बातम्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे, राज्य शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.