– लढाई त्यांनी सुरु केली असली तरी त्याचा अंत आपण करणार – सुप्रिया सुळे
– छगन भुजबळांच्या येवल्यातून शरद पवारांनी प्रचंड गर्दीत राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडला…
नाशिक :- काही लोक सांगतात माझे वय झाले. वय झाले ही गोष्ट जरी खरी असली तरी गडी काय आहे हे तू पाहिलंय कुठे? उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी येवला येथील जाहीर सभेत दिला.
आमची तक्रार इतकीच आहे ज्या जनतेने निवडून दिले, ज्या जनतेला वचन दिले त्या जनतेच्या विश्वासाला तडा बसणारे पाऊल तुम्ही टाकले असेल तर ती गोष्ट आम्ही सहन करणार नाही. ती गोष्ट कोणी करत असेल तर त्यांना त्यांची किंमत आज ना उद्या द्यावी लागेल. तो इतिहास इथे घडेल, अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली.
जनतेशी संवाद साधण्याचा हाती घेतलेला निर्धार आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सुरु झाला. एक काळ असा होता की, नाशिक जिल्ह्यात गेल्यानंतर माझी पहिली फेरी येवला इथे असायची. आमचे अनेक सहकारी इथे होते. राजकारणात चढउतार झाला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली नाही. त्यामध्ये जनार्दन पाटील, मारोतीराव पवार, अंबादास बनकर, कल्याणराव पाटील, आणि अलीकडच्या काळातील दराडे बंधू यांची आठवण होते. या सगळ्यांबरोबर एका कालखंडात काम करण्याची संधी मिळाली. अलीकडे जबाबदारी वाढली, देशपातळीवर काम करण्याची स्थिती आल्याने इथे येणे कमी झाले असेही शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांनी गेली अनेक वर्षे पुरोगामी विचाराला साथ दिली त्यामध्ये नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर येतो. या जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, आदीवासी या सर्वांवर संकटे आली तरी त्यांनी साथ सोडली नाही. त्यामुळे विचार केला की मुंबईमध्ये काही लोकांना जनतेसमोर सादर केल्यावर यश मिळवता आले नाही पण महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आणायचे असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही येवल्याची निवड केली. इथे निवडणुकीसाठी दिलेली नावे कधी चुकली नाहीत. पण एका नावाने घोटाळा झाला. त्याठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला. त्यासाठी आज मी माफी मागण्यासाठी आलोय. माझा अंदाज फारसा चुकत नाही पण इथे माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही निकाल घेतले. त्यामुळे तुम्हाला यातना झाल्या. आगामी काळात लोकांसमोर जायची वेळ येईल तेव्हा मी पुन्हा येऊन चुक न करता योग्य निकाल सांगेल त्याला या तालुक्यातील मतदाराची साथ मिळेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
येवला मतदारसंघात पाण्याचा, उद्योग-धंद्याचा, कांद्याच्या किंमतीचा प्रश्न आहे. राजकारण हे सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करायचे असते असे सांगतानाच या मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे. स्वातंत्र्याच्या संघटनेत परकीयांविरोधात लढण्यासाठी तात्या टोपेंनी ऐतिहासिक काम केले त्यांची ही भूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीत हा तालुका आणि जिल्हा अग्रस्थानी राहीला. अनेक वर्षे तुरुंगात जावे लागेल त्याची फिकीर केली नाही. त्यामुळे इथले लोक अडचणी असतील, संकटे असतील तरी स्वाभिमान कधी सोडणार नाहीत. या स्वाभिमानी लोकांना खऱ्या अर्थाने पुन्हा शक्ती द्यायची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केले. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी जे आरोप केले त्याबाबतीत तुमच्या हाती असलेल्या देशाच्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचारात सहभागी असेल त्याला पाहीजे ती शिक्षा द्यावी त्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा राहील असेही शरद पवार यांनी जाहीर केले.
नाशिक जिल्हा अनेक क्षेत्रात पुढे जातोय पण येवल्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा लागेल असे आश्वासनही शरद पवार यांनी दिले.
लढाई त्यांनी सुरु केली असली तरी त्याचा अंत आपण करणार – सुप्रिया सुळे
माझ्या विचारांशी माझी निष्ठा आहे. मला पद नाही मिळाले तरी माझा विचार मी कधी सोडणार नाही. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणारा हक्काचा माणूस शरद पवारसाहेब आहेत. त्याच्याविरोधात षडयंत्र सुरु आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाविरोधात आणि आपल्या राज्याचे महत्व कमी करण्याचे षडयंत्र दिल्लीचा अदृश्य हात करतोय. समोर कोणीही बसला असेल तरी त्याविरोधात आम्ही लढा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. सेवा, सन्मान, आणि स्वाभिमान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून लढाई त्यांनी सुरु केली असली तरी त्याचा अंत आपण करणार असा थेट इशारा राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिला.
येवलामध्ये आल्यावर कांद्याचे क्रेट पाहिल्यावर वर्षभर केंद्रसरकारशी कांद्याच्या भावावर भांडण केले याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांना करून दिली.
जगात कांदा कमी आहे, आपल्या देशात कांदा उत्पादन जास्त झाले असल्याने आपला कांदा परदेशात पाठवण्याची मागणी केली. पण भाजपने कांदा बाहेर जाऊ न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केंद्रसरकारवर केला.
कांद्यासोबत शेतकऱ्यांच्या टोमॅटोला भाव देत नाही. शहरात टोमॅटो महागले आहेत मग मधले पैसे जातात कुठे असा प्रश्नही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
तुमच्या हक्काची ताई या नात्याने जे म्हणाल ते काम करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त करतानाच महागाई आणि बेरोजगारीचा विचार केला तर येवला जिल्ह्यात किती उद्योग आले याचा विचार करायला हवा. जो पवारसाहेबांवर प्रेम करेल, निष्ठा ठेवेल, त्यांना साथ देईल असा आमदार निवडून दिल्यास तुमच्या कांद्याला भाव देऊन तुमच्या हाताला काम मिळण्याची व्यवस्था करू असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले.
ही लढाई सोपी नाही. निश्चयाने आणि ऐकीने लढलो तर महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीसमोर ‘ना झुका है ना झुकेगा’ असा दावाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
मारोतीराव पवार जेव्हा आमदार होते त्यावेळेसदेखील दोन – तीन वेळा बंडाचे नाटक झाले होते आणि जेव्हा – जेव्हा बंडाचे नाटक झाले तेव्हा प्रत्येकवेळी पवारसाहेबांच्या बाजूने ठामपणे भूमिका घेणारे पहिले आमदार हे मारोतीराव पवार होते. तुमच्यासारखी माणसं आजकाल भेटत नाहीत असे सांगतानाच आजकाल रंग बदलणारे सरडे या जगात जास्त झाले आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
नाशिककरांसमोर आत्ता एक नवीन आव्हान आहे. नाशिक आणि शरद पवार यांचे एक वेगळे नाते आहे. शरद पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हा नाशिकरांना हाक दिली आहे तेव्हा नाशिकरांनी १४ -१४ आमदार पवारसाहेबांच्या मागे उभे केले हा नाशिककरांचा इतिहास आहे आणि त्यांचा मला अभिमान आहे अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले.
साहेबांचे हात महाराष्ट्रामध्ये मजबूत नाशिककरांनी केले, आणि साहेबांनी निर्णय कसा घेतला बघा ,साहेब महाराष्ट्राचा दौऱ्यावर निघाले आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात गोदावरी काठच्या पवित्र आणि ऐतिहासिक अशा नाशिक जिल्ह्यातुन आज करत आहेत , ज्या नाशिक जिल्ह्याने यशवंतराव चव्हाणांनां बिनविरोध निवडुन दिले होते आणि आता जेव्हा महाविकास आघाडीची सभा लागेल आणि मविआ जेव्हा निवडणूकीला उतरेल त्यावेळेस तुम्ही शरद पवारसाहेबांचा एकही शब्द खाली पडु देणार नाही अशी खात्रीही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
साहेब तुम्ही फक्त सांगा ,शेंदूर लावा, ते आम्ही करून टाकू असा हुंकार तुम्ही साहेबांना द्याल इतकीच अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
कांदा पडला , द्राक्षांवर संकट आले , जेव्हा शेतकर्यांवर संकट आले त्यावेळेस शरद पवार तुमच्यासाठी उभे राहिले. साहेब महाराष्ट्राचे आधारवड आहेत
सर्वसामान्यांचा नेता ,दलित शोषितांचे नेता, कामगारांचा नेता, शेतकर्यांचा नेता असा एकच नेता म्हणजे शरद पवार असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आपले विचार मांडले.
या सभेला राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे मुख्य प्रतोद आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल भुसारा कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार मारुतीराव पवार, माजी आमदार हेमंत टकले, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.