नागपूर :- नागपूर शहरामध्ये उन्हाच्या वेळेत कुठल्याही क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी सुचना नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत क्रीडा व सांस्कृतिक संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना देण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनेचा कृती आराखडा नियोजनाबाबत आढावा घेतला होता. त्यावेळी आयुक्तांनी केलेल्या सूचना आणि दिलेल्या निर्देशानुसार क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी संघटनांना सुचना दिली आहे.
क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे क्रीडा व सांस्कृतिक संघटना आणि शाळा महाविद्यालयांना दिलेल्या आदेशामध्ये उन्हाच्या वेळेत खेळाच्या स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येउ नये, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्रीडा स्पर्धांच्या दरम्यान पिण्याचे शुद्ध पाणी, थंड जागा व गर्दीचे योग्य नियोजन असेल याबाबत खात्री करावी तसेच उपस्थितांमध्ये उष्मालाट विषयी जनजागृती करण्याचे देखील आवाहन केले आहे.
नागपूर शहरातील तापमान वाढत असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त संभावतो. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे. नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचे टाळावे. उन्हात जाण्याचे वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा. तसेच उन्हात अतिकष्टाची कामे करू नये, दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेउ नये, दुपारी १२ ते ३ दरम्रान घराबाहेर जाणे टाळावे, उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाउ नये, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद, घट्ट व जाड कपटे घालण्याचे टाळावे, बाहेर जास्त तापमान असल्यास शारीरिक श्रमाची कामे करू नये, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावित या सर्व बाबींची काळजी घेण्याचे देखील आवाहन मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.