नागपूर दि. 07 : देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्यात येतो. यावर्षी जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय मतदार दिनाच्या उत्सवा करीता केले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. जिल्ह्यात एक लाखावर मतदार वाढले आहेत. मात्र 18 वर्षावरील कोणताही नागरिक मतदान यादीत नाही असे होऊ नये, यासाठी आवश्यक तो सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज या संदर्भात बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय व विविध स्वयंसेवी संस्था यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये. शंभर टक्के मतदान. शंभर टक्के मतदार हे लोकशाहीचे स्वप्न असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये 1 नोव्हेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या काळामध्ये राबविण्यात आलेल्या विविध मोहिमांमध्ये यश मिळाले आहे. जिल्ह्यात 47 हजार 7 पुरुष. 55 हजार 234 महिला. तर 75 तृतीयपंथी मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मतदारांमध्ये वाढ झाली आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी 40 लक्ष 88 हजार 234 असणारी मतदार यादी 5 जानेवारी रोजी 41 लक्ष 90 हजार 550 मतदारांची झाली. एकूण 1 लक्ष 2 हजार 316 वाढ आहे. सहज, सुलभ पद्धतीने मतदार नोंदणी शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने आपले नाव मतदार यादीत येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आजच्या बैठकीला मार्गदर्शन करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी महानगरपालिका, विद्यापीठ प्रशासन, जिल्हा परिषद, नगर परिषद, पालिका, ग्रामपंचायत स्तरावर मतदान नोंदणी संदर्भात अभियान राबविण्याचे आवाहन केले. याशिवाय येत्या 25 तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालयात, विविध स्पर्धा व्याख्याने आयोजित करण्याबाबत आजच्या बैठकीत निर्देशीत केले. जिल्ह्यातील उद्योग समूहाने देखील वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे व कार्यक्रमाला मतदार नोंदणीची जोड द्यावी असे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत बैठक घेऊन मतदार जागृती मंचद्वारे शपथ घेऊन राष्ट्रीय मतदार दिन साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनामार्फत 25 तारखेला सकाळी सायकल रॅली, तर दुपारी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणाऱया सर्व संस्थांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाला कार्यक्रम आयोजनाची उद्दिष्ट दिले असून ते प्रत्येक विभागाने पूर्ण करावे असे आवाहनही त्यांनी केले.
25 जानेवारी मतदान दिन
भारतीय लोकशाहीचा महाकाय कारभार सांभाळणाऱ्या भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. मात्र 2011 पासून हा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश नवमतदारांना मतदान यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे आहे. त्यासाठी सुलभ पद्धतीने नोंदणी करणे, नव मतदाराचा उत्साह वाढविणे, त्यांचा सत्कार करणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.