वैद्यकीय क्षेत्रातील कुशल व्यवस्थापनाचा गौरव
दवाखाना आपल्या दारी या अभिनव उपक्रमाचा गौरव
नागपूर :- प्रशासनात लोकाभिमुखता, तत्पर निर्णयक्षमता आणि लोकसहभागाचे तत्व जपत उत्तम प्रशासनाचा आपल्या कार्यशैलीतून वस्तुपाठ घालून देणारे जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. विपीन इटनकर यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाचे तृतिय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र शासनाने आज 26 मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असून त्यांना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांना दवाखाना आपल्या दारी या अभिनव उपक्रमाला सर्वोत्कृष्ट कल्पना/ उपक्रम या गटात तृतिय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यात महानगरापासून ग्रामपंचायतीपातळीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल दूरदृष्टीतून आरोग्य सुविधांची एक भक्कम श्रृंखला निर्माण करण्यात आली आहे. जे व्यक्ती दवाखान्यापर्यंत उपचारासाठी पोहचू शकत नाहीत अशा नागरिकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहचवून कोणताही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी दवाखाना आपल्या दारी या अभिनव उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या उपक्रमाला आता महाराष्ट्र शासनाने तृतिय क्रमांकाचे पारितोषिक देऊन एक आदर्श उपक्रम म्हणून नावारुपास आणले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे सिईओ विनायक महामुनी यांनी या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड येथील कोरोना उद्रेकाची स्फोटक परिस्थिती यशस्वीरित्या हाताळून वैद्यकीय क्षेत्रातील व्यवस्थापनाचा एक आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आहे.