-पहिल्याच दिवशी 788 मुला-मुलींना लस
भंडारा, दि. 3 : आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 788 मुला-मुलींना लस देण्यात आली. 373 मुले तर 415 मुली लसवंत झाल्यात. मॉयनारीटी हॉस्टेल येथे अरुंधती तुरस्कर, यामीनी बैस, मयंक चावरे, प्रतिक्षा मानापूरे यांना लस देण्यात आली.
भंडाऱ्यात जिल्हा रुग्णालय भंडारा, साकोली उपजिल्हा रुग्णालय, लाखनी ग्रामीण रुग्णालय, अड्याळ ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर ग्रामीण रुग्णालय, पवनी ग्रामीण रुग्णालय, मोहाडी ग्रामीण रुग्णालय, सिहोरा ग्रामीण रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय या शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोफत लस देण्यात आली. सर्व पालकांनी आपल्या 15 ते 18 वयोगटातील पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
आज जिल्हा रुग्णालय भंडारा येथे युगल धुर्वे, ज्ञानम भलगट, खुशाल लाहोटी, पूर्वा येळणे यांना लस देण्यात आली. तर लाखनी येथे कु. पूर्वा नरेश नवखरे (राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय), या विद्यार्थ्यांनीने पहिली लस घेण्याचा मान मिळवला. यावेळी तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बोधनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हटनागर व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.