नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे वितरण तसेच पंचायतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन झाले.
गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरण वेगाने वाढले असून देखील बहुतांश लोकसंख्या अद्याप ग्रामीण भागात राहते आहे, जे शहरात वास्तव्य करत आहेत ते देखील या ना त्या कारणाने गावांशी जोडले गेले आहेत, गावांच्या विकासामुळेच संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
गावाच्या विकासाची रूपरेषा किंवा आराखडा कसा असावा आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी, याचा निर्णय ग्रामीण जनतेला घेता यायला हवा, असे त्यांनी सांगितले. पंचायत म्हणजे केवळ सरकारी उपक्रम आणि योजना राबवण्याचे साधन नव्हे तर नवे नेतृत्व, योजनाकर्ते, धोरण कर्ते आणि नवोन्मेषक तयार करण्याचे, घडवण्याचे स्थान असायला हवे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. एका पंचायती मधील सर्वोत्तम पद्धती इतर पंचायतींमध्ये अंमलात आणून आपली गावे आपण लवकर विकसित आणि समृद्ध करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
ज्या समाजात परस्पर सहकार्य आणि एकमेकांप्रती विश्वास असतो, त्या समाजाची अधिक भरभराट होते. गाव हे एक विस्तारित कुटुंब असते, हे लक्षात घेऊन सर्व सामुदायिक कार्य शक्य तितक्या परस्पर सामंजस्याने केली पाहिजेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता, महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. महिलांना स्वतःसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठीचे निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. कुटुंबात आणि गावपातळीवर महिलांचे सक्षमीकरण झाले तर त्यांना हा अधिकार साध्य होईल, असं त्या म्हणाल्या. स्थानिक ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या 31.5 लाखाहून अधिक निवडून आलेल्या प्रतिनिधींपैकी 46 टक्के महिला आहेत, याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या कार्यात महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि या कार्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महिलांच्या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन देखील राष्ट्रपतींनी केले.